मध्य रेल्वे मार्गावरील डीसी-एसी परिवर्तनानंतर हँकॉक पुलाखालून जाताना लोकलवर वेग मर्यादा घालण्यात आल्याने लोकल गाडय़ांचा वेग काहीसा मंदावला होता. मात्र रविवारी पुलाच्या यशस्वी पाडकामानंतर मध्य रेल्वेने लोकल गाडय़ांवरील वेग मर्यादा तातडीने काढल्याने प्रत्येक लोकल गाडीच्या एका फेरीमागे किमान दोन मिनिटांची बचत होणार असल्याचा दावा मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य जलद मार्गावर रोज २४१ तर धिम्या मार्गावर ५८१ फेऱ्या चालवल्या जातात. प्रत्येक तासाला सर्वसाधारण बारा लोकल या मार्गावर चालवल्या जाऊ शकतात. मात्र हँकॉक पुलाखालून जाताना सुरक्षेच्या कारणास्तव पूल तोडण्यापूर्वी ताशी ५० कि.मी.ची वेग मर्यादा घालण्यात आल्याने प्रतितास दहा लोकल गाडय़ा चालवण्यात येत होत्या. मात्र रविवारी हँकॉक पूल पाडण्यात आल्याने लोकलवरील वेगमर्यादा काढण्यात आली आहे. यामुळे लोकल ताशी ८० कि.मी.ला धावणार असून प्रत्येक लोकलच्या एका फेरीमागे दोन मिनिटांची तर तासाभरात २४ मिनिटांची बचत होणार असल्याचा दावा मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने केला.