मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील पुनर्विकास कामानिमित्त वाहतूक ब्लाॅक घेतला असून १ फेब्रुवारी ते २६ एप्रिल असा एकूण ८५ दिवसांचा ब्लाॅक असेल. या ब्लाॅकमुळे कोकण, मराठवाडा, विदर्भातून सीएसएमटीत येणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना सीएसएमटी गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल. तसेच प्रवाशांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागेल.
देशातील सर्वाधिक गजबजलेल्या स्थानकांपैकी एक मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे स्थानक आहे. दररोज येथून अर्धशतकांहुन अधिक रेल्वेगाड्या धावतात. परंतु, सीएसएमटीतील पुनर्विकास कामानिमित्त सुमारे ८५ दिवस फलाट क्रमांक १६, १७ बंद केला जाणार आहे.
रेल भूमी विकास प्राधिकरण (आरएलडीए) द्वारे सीएसएमटीच्या पुनर्विकासाचे काम सुरू असून, त्या अनुषंगाने मध्य रेल्वेकडून सीएसएमटी येथील फलाट क्रमांक १६ व १७ वर ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत फलाट क्रमांक १६ व १७ वर पायाभूत कामे, तसेच आवश्यक संबंधित कामे केली जातील. ब्लॉक कालावधीत रेल भूमी विकास प्राधिकरणकडून काम पूर्ण होऊन फलाट वाहतुकीसाठी सुपूर्द होईपर्यंत ०१ फेब्रुवारीपासून फलाट क्रमांक १६ व १७ वरून रेल्वेगाड्यांची वाहतूक पूर्णतः बंद राहील. त्यामुळे सीएसएमटीकडे येणाऱ्या रेल्वेगाड्यांची सेवा दादर येथे समाप्त होईल. या रेल्वेगाड्यांची सेवा सीएसएमटी-दादर दरम्यान नसेल. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होतील.

