मुंबई : डोंबिवली स्थानकात नवीन पादचारी पुलाची तुळई बसविणे आणि घाटकोपर स्थानकातील जुन्या पादचारी पुलाचे बांधकाम हटविण्यासाठी मध्य रेल्वेकडून ३० ऑक्टोबरच्या मध्यरात्री विशेष वाहतूक व विद्युत ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे काही लोकलच्या मार्गात बदल करण्यात येणार असून, मेल-एक्स्प्रेस गाड्यांनाही विलंब होण्याची शक्यता आहे. या ब्लाॅकमुळे शेवटच्या आणि पहिल्या लोकलला कोपर, ठाकुर्ली स्थानकांचा थांबा रद्द असेल.
डोंबिवली स्थानकातील नवीन उत्तरेकडील पादचारी पुलाची तुळई बसविण्यासाठी ३० ऑक्टोबरच्या मध्यरात्री १.२० ते ३.५० या वेळेत दिवा – कल्याणदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर अडीच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून रात्री १२.०८ वाजता सुटणारी कसारा लोकल आणि रात्री १२.१२ वाजता सुटणारी कर्जत लोकल ठाणे – कल्याणदरम्यान डाऊन जलद मार्गावरून चालविण्यात येईल. या लोकल सेवांना कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांत थांबा नसेल.
तसेच, कर्जतहून पहाटे २.३० वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल कल्याण – ठाणेदरम्यान अप जलद मार्गावरून चालविण्यात येईल. या लोकललाही कोपर आणि ठाकुर्ली येथे थांबा मिळणार नाही. दरम्यान, घाटकोपर स्थानकातील जुन्या उत्तरेकडील पादचारी पुलाचे बांधकाम हटविण्यासाठी ३० ऑक्टोबरच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामासाठी अप आणि डाउन मार्गावरील थ्रू मार्गावर रात्री १.१५ ते २.३०, तर अप आणि डाऊन लोकल मार्गावर रात्री १.१५ ते पहाटे ३.४५ या वेळेत ब्लॉक असेल. याच रात्री डोंबिवली परिसरातही पाचव्या आणि सहाव्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
डाऊन आणि अप थ्रू मार्गावर रात्री १.२० ते २.५०, तर पाचव्या आणि सहाव्या मार्गावर रात्री १.२० ते पहाटे ४.२० या वेळेत काम चालेल. यामुळे एलटीटी – गोरखपूर एक्स्प्रेसला ठाणे – दिवादरम्यान डाऊन जलद मार्गावरून आणि दिवा – कल्याणदरम्यान डाऊन धीम्या मार्गावरून वळवण्यात येईल. ही गाडी १५ ते २० मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे. शालीमार – एलटीटी आणि विशाखापट्टणम – एलटीटी एक्स्प्रेस कल्याण – दिवा दरम्यान अप जलद मार्गावरून चालविण्यात येतील. या गाड्यांनाही गंतव्यस्थानी पोहोचण्यास १५ ते २० मिनिटे विलंब होण्याची शक्यता आहे. ब्लॉक कालावधीत अन्य मेल – एक्स्प्रेस आणि विशेष गाड्यांच्या मार्गातही परिचालनाच्या गरजेनुसार बदल होऊ शकतात. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले.
