मुंबई : मध्य रेल्वेवरील विविध रेल्वे स्थानकांनी आणि परिसरांनी पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधून घेतले असून, गेल्या काही दशकांपासून हिंदी चित्रपट, वेब सिरीज, जाहिराती आणि दूरचित्रवाणी मालिकांसाठी मध्य रेल्वेतील ठिकाणे चित्रिकरणासाठी सर्वाधिक पसंतीचे ठरत आहेत. जागतिक वारसा लाभलेली वास्तू, निसर्गरम्य घाट परिसर, ग्रामीण भागातील स्थानके आणि रेल्वे यार्ड यामुळे मध्य रेल्वे चित्रपट निर्मात्यांसाठी वास्तवदर्शी आणि आकर्षण बनले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे जागतिक वारसा स्थळ असलेले स्थानक आजही चित्रपट निर्मात्यांचे सर्वाधिक आवडते ठिकाण आहे. येथे ‘स्लमडॉग मिलियनेअर’मधील ‘जय हो’ गाणे, ‘रब ने बना दी जोडी’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘डर’, ‘लंच बॉक्स’, ‘स्टोनमॅन’ यांसारख्या चित्रपटांचे तसेच आयपीएल, सनफीस्टसह अनेक जाहिरातींचे चित्रिकरण झाले आहे. अभिनेता अमिताभ बच्चन यांनीही मध्य रेल्वेच्या ‘एक सफर रेल के साथ’ या निर्मितीसाठी सीएसएमटी येथे चित्रीकरण केले होते.

वाडीबंदर यार्ड येथे ‘कामिनी’, ‘जब वी मेट’, तसेच लोकप्रिय वेब सिरीज ‘सिक्रेट गेम’साठी सेट उभारून चित्रिकरण करण्यात आले. तर चौक रेल्वे स्थानक परिसरात अभिनेता सलमान खान अभिनित दबंग चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. दादर, शीव, पनवेल, कॉटनग्रीन आणि सानपाडा या रेल्वे स्थानकांवर ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘भावेश जोशी डोंबिवली फास्ट’, ‘दरबार’ यांसारख्या चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.

अभिनेता रजनीकांत अभिनित

‘रोबोट’, अभिनेता अभिषेक बच्चन ‘अभिनित रावण’, करिना कपूर अभिनित ‘जब वी मेट’ या चित्रपटांचे चित्रीकरण पुणे आणि लोणावळा रेल्वे स्थानकावर झाले आहे. अलीकडील लोकप्रिय लापता लेडीज चित्रपटाचे चित्रीकरण पुणे विभागातील बेलापूर, येवला आणि कान्हेगाव स्थानकांवर झाले.

गेल्या तीन वर्षांत जवळपास ३० चित्रपट आणि वेब सिरीजच्या चित्रीकरणामधून मध्य रेल्वेला तब्बल २.२९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. २०२३-२४ मध्ये ९४.४५ लाख, २०२४-२५ मध्ये ४०.१३ लाख आणि २०२५-२६ मध्ये ९४.६२ लाख रुपयांचा महसूल मिळाला.

आपटा स्थानक बॉलिवूडचे आवडते स्थळ

आपटा रेल्वे स्थानक हे सीएसएमटनंतर बॉलिवूडचे सर्वाधिक पसंतीचे चित्रीकरण स्थळ आहे. रायगड जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले हे स्थानक डोंगर, पावसाळ्यातील धबधबे आणि जुन्या शैलीतील स्थानक इमारतीमुळे ग्रामीण आणि जुन्या काळातील रेल्वे स्थानकाचा अनुभव देते.

मुंबईपासून अवघ्या ९० किलोमीटर अंतरावर असल्याने चित्रपट निर्मात्यांसाठी येथे पोहोचणे सोयीचे ठरते. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘रंग दे बसंती’, ‘खाकी’, ‘बंटी और बबली’, ‘पीके’, ‘बागी’, ‘बाजार’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे. गेल्या तीन वर्षांत केवळ आपटा स्थानकावरील चित्रीकरणातून मध्य रेल्वेला ८५.५५ लाख रुपये महसूल मिळाला असून, तो एकूण महसुलाच्या ३७ टक्क्यांहून अधिक आहे.

अनुपम खेर यांच्या आठवणींना उजाळा

अभिनेते अनुपम खेर यांनी नुकत्याच ‘फ्लिकर’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आपटा स्थानकाला भेट दिली. यावेळी त्यांनी ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (डीडीएलजे) चित्रपटातील शाह रुख खान आणि काजोल यांच्यासोबतच्या प्रसिद्ध रेल्वे दृश्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ३२ वर्षांनंतर त्याच ठिकाणी उभे राहिल्यावर काळ थांबल्यासारखे वाटले, असे त्यांनी समाज माध्यमावर म्हटले.

चित्रिकरणासाठी सिंगल विंडो सुविधा

मध्य रेल्वेकडून चित्रपट चित्रीकरणासाठी परवानग्या देण्यासाठी स्वतंत्र जनसंपर्क विभाग कार्यरत असून, सिंगल विंडो प्रणालीद्वारे प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. सुरक्षा नियम, निर्धारित शुल्क आणि रेल्वे ब्लॉकची उपलब्धता लक्षात घेऊन परवानग्या दिल्या जातात.

मध्य रेल्वेने चित्रपट निर्मिती संस्थांना सीएसएमटी, आपटा, पनवेल, चौक, नेरळ, माथेरान, लोणावळा, खंडाळा, वाठार आणि सातारा यांसारख्या ठिकाणाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.