मुंबईला रविवारी मध्यरात्री मुसळधार पावसानं झोडपून काढलं. यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. लांब पल्ल्याच्या गाड्याचं वेळापत्रक कोलमडून गेलं आहे. मुंबईतून सुटणाऱ्या ९ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांची वेळ बदलण्यात आली आहे. ठाणे, माटुंगा भागात रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नऊ गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे ऐनवेळी हाल झाले आहेत.

रेल्वे प्रशासनाद्वारे नऊ एक्स्प्रेस रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे

  • 02188 मुंबई जबलपूर गरिब रथ विशेष यात्रा
  • 02811 लोकमान्य टिळक टर्मिनस हटिया विशेष यात्रा
  • 02169 मुंबई नागपूर विशेष विशेष यात्रा
  • 01141 मुंबई आदिलाबाद विशेष यात्रा
  • 02105 मुंबई गोंदिया विशेष यात्रा
  • 02109 मुंबई मनमाड विशेष यात्रा
  • 07057 मुंबई सिकंदराबाद विशेष
  • 02111 मुंबई अमरावती विशेष यात्रा
  • 07612 मुंबई नांदेड राज्यराणी विशेष

Video : कल्याण रेल्वे स्थानकावर मोठा अनर्थ टळला; वयोवृद्ध व्यक्तीला मिळालं जीवदान

वरील गाड्या रद्द झाल्याचे लक्षात घेऊन प्रवाशाने रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईत अतिवृष्टी झाल्यानं प्रचंड हाहाकार उडाला होता. मुंबईत काही भागांत दुर्घटनाही घडल्या असून, मुंबईच्या वाहतुकीलाही फटका बसला आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला. रात्रभर झालेल्या पावसाने मुंबईतील अनेक रस्त्यांबरोबरच रेल्वे रुळ पाण्याखाली गेले होते. तर सायनसह अनेक रेल्वे स्थानकांवरही प्रचंड पाणी साचलं होतं. त्यामुळे रविवारी सकाळी ६ वाजल्यापासूनच लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती.