मुंबई : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकिट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल केला. प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास घडावा यासाठी मध्य रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर या विभागात अनधिकृत आणि विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. यासाठी सातत्याने आणि सखोल तिकीट तपासणी मोहीम सुरू केली.

मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये (एप्रिल – ऑक्टोबर २०२५) विनातिकीट प्रवाशांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले. मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी २०२५-२६ मध्ये विनातिकिट, वैध तिकीटविना प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांना पकडले. ही संख्या २०२४-२५ मध्ये २२.०९ लाख इतकी होती. त्यात सुमारे ८ टक्क्यांची वाढ झाल्याचे निदर्शनास आले. प्रशासनाला २०२५-२६ मध्ये दंडाच्या रुपात १४१.२७ कोटी रुपये विक्रमी रक्कम वसूल करण्यात यश आले. तर, २०२४-२५ मध्ये विनातिकीट प्रवाशांकडून १२४.३६ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला होता. यामध्ये सुमारे १४ टक्क्यांची वाढ झाली.

मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये विनातिकिट प्रवास करणाऱ्या ३.७१ लाख प्रवाशांना पकडले. तर ऑक्टोबर २०२४ मध्ये ३ लाख प्रवाशांची धरपकड करण्यात आली होती. त्यात सुमारे २४ टक्क्यांची वाढ झाली. विनातिकिट प्रवाशांकडून ऑक्टोबर २०२५ मध्ये २४.८१ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला असून ऑक्टोबर २०२४ मध्ये १२.७४ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला होता. यामध्ये सुमारे ९५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

गेल्या सहा महिन्यांतील विनातिकीट प्रवासी आणि वसूल केलेला दंड

भुसावळ विभागात ६.०७ लाख प्रकरणांमधून ५१.७४ कोटी रुपये, मुंबई विभागात ९.६३ लाख प्रकरणांमधून ४०.५९ कोटी रुपये, नागपूर विभागात २.५३ लाख प्रकरणांमधून १५.६२ कोटी रुपये, पुणे विभागात २.६७ लाख प्रकरणांमधून १५.५७ कोटी रुपये, सोलापूर विभागात १.४१ लाख प्रकरणांमधून ६.७२ कोटी रुपये आणि मध्य रेल्वे मुख्यालयात १.४५ लाख प्रकरणांमधून ११.०३ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला.

मध्य रेल्वेवर दररोज ८० वातानुकूलित लोकल धावतात. या लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांसंबंधी तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली. यासाठी व्हॉट्स ॲप तक्रार क्रमांक ७२०८८१९९८७ उपलब्ध करण्यात आला आहे. आता वातानुकूलित लोकल तिकीट तपासणी पथक दररोज सरासरी ३६८ विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून सरासरी १.१९ लाख रुपये दंड वसूल करीत आहे.