मुंबई : दादर – रत्नागिरी रेल्वेगाडी चालवण्याबाबत प्रवाशांची प्रचंड मागणी असताना ही रेल्वेगाडी तातडीने सुरू करण्याबाबत मध्य रेल्वे प्रशासन सकारात्मक नसल्याचे दिसून येत आहे. पाचवी – सहावी मार्गिका पूर्ण झाल्यावर दादर – रत्नागिरी रेल्वेगाडी चालवण्यात येण्याची ठाम भूमिका मध्य रेल्वेने घेतली आहे. तसेच नवीन रेल्वेगाडी सुरू करण्यासाठी रेल्वे मंडळाचा निर्णय अंतिम असेल, अशी स्पष्टोक्ती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केली.
आर्थिक वर्ष २०२५-२६ दरम्यान मध्य रेल्वेच्या विभागांनी केलेल्या यशाची आणि प्रमुख टप्प्यांची माहिती देण्यासाठी गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पुरातन वारसा वास्तूचा दर्जा असलेल्या इमारतीत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी, मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिरेश मीणा, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला व इतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मध्य रेल्वेतील विविध कामगिरी, वातानुकूलित लोकल फेऱ्यांची केलेली वाढ, तरघर, गव्हाण या दोन रेल्वे स्थानकांची निर्मिती, वाढलेला महसूल याबाबत माहिती दिली. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांना दादर – रत्नागिरी रेल्वेगाडी कधी सुरू करण्याबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी सांगितले की, दादर – रत्नागिरी रेल्वेगाडीमुळे सहा ते सात लोकल थांबवाव्या लागतात. लोकलचा वक्तशीरपणा कमी होतो. त्यामुळे कुर्ला – परळ दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर दादर – रत्नागिरी रेल्वेगाडी सोडण्याचा विचार केला जाईल.
सध्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे भूसंपादनाचे काम सुरू असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर प्रवाशांना या रेल्वेगाडीची सेवा मिळेल, असे मत मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. परंतु, प्रकल्प कधी पूर्ण होईल, त्यानंतर रेल्वेगाडी कधी सुरू होईल, याबाबत कोणतीही माहिती रेल्वे अधिकाऱ्यांद्वारे देण्यात आली नाही. तसेच उत्तर आणि दक्षिण भारतातून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे लोकलच्या वक्तशीरपणावर परिणाम होतो.
त्यामुळे या रेल्वेगाड्यांची सेवा कसारा, कर्जत, कल्याणपर्यंत थांबविणार का ? तसेच, कोकणातील रेल्वेगाड्या पनवेल चालवण्यात येणार का असे प्रश्न उपस्थित केल्यानंतर यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले नाही. मध्य रेल्वेद्वारे दादर – रत्नागिरी रेल्वेगाडी सुरू करण्याचा प्रश्न अधांतरी आहे. प्रश्नांचा भडिमार सुरू झाल्यानंतर, पत्रकार परिषद आटोपती घेतली आणि महाव्यवस्थापक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे काय ?
करोना काळात दादर – रत्नागिरी रेल्वेगाडी बंद करण्यात आली होती. त्यानंतर वक्तशीरपणाचे कारण देत सप्टेंबर २०२१ मध्ये दादर स्थानकाऐवजी दिवा स्थानकातून चालवण्यास सुरुवात केली. दिवा स्थानकामध्ये या रेल्वेगाडीमुळे १२ ते १५ मिनिटे लागतात. यात ६ ते ७ लोकल थांबवाव्या लागतात. त्यामुळे लोकलच्या वक्तशीरपणावर परिणाम होत असल्याने दादर – रत्नागिरी रेल्वेगाडी दिवा स्थानकातून चालविण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले. परंतु, लोकलच्या वक्तशीरपणाबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी पायाभूत कामे सुरू असल्यामुळे वक्तशीरपणात सुधारणा झाली नाही, असे महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांनी व्यक्त केले. तसेच पायाभूत कामे पूर्ण झाल्यानंतर वक्तशीरपणात वाढ होईल, असा दावा गोस्वामी यांनी केला.
——————–
