मध्य रेल्वे मार्गावर बहुचर्चित आणि बहुप्रलंबित असलेले डीसी-एसी विद्युत परिवर्तन आता २३ मेच्या मध्यरात्री होणार आहे. या परिवर्तनामुळे मध्य रेल्वेवरील प्रवासाचा वेग वाढण्याची शक्यता असून विजेचीही बचत होणार आहे. तसेच या परिवर्तनामुळे मध्य रेल्वेवरील एका ऐतिहासिक कालखंडाचाही अस्त होणार आहे. गेली ९० वर्षे डीसी विद्युतप्रवाहावर चालणारी मध्य रेल्वेची उपनगरीय वाहतूक पूर्णपणे एसी विद्युत प्रवाहावर धावण्यास सुरुवात होईल, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी सांगितले.
मध्य रेल्वे मार्गावर १९२५ सालापासून डीसी (डायरेक्ट) विद्युतप्रवाहावर गाडय़ा धावत आहेत. त्यानंतर गेल्या ९० वर्षांत संपूर्ण भारतातील विद्युत प्रवाह एसी (अल्टरनेट) करण्यात आला. पश्चिम रेल्वेवरही उपनगरीय मार्गावर डीसी-एसी परिवर्तन पूर्ण झाले आहे. मध्य रेल्वेवरही सुरुवातीला कल्याण आणि त्यानंतर ठाणे या स्थानकांपर्यंत डीसी-एसी परिवर्तन पूर्ण झाले. गेल्या वर्षी ठाण्यापर्यंतचे काम झाल्यावर ठाणे ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली होती. मध्य रेल्वेने जानेवारी महिन्यात डीसी-एसी परिवर्तनाची चाचणीही घेतली.
त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मध्य रेल्वेवरील डीसी-एसी परिवर्तनाला प्रमाणपत्र देताना ७४ ठिकाणांबाबत प्रश्नचिन्ह व्यक्त केले होते. मध्य रेल्वेने सवलत प्रमाणपत्रासाठी रेल्वे बोर्डाकडे अर्ज केला होता. रेल्वे बोर्डानेही हे सवलत प्रमाणपत्र दिले होते. त्यानंतर मग रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र मिळाल्यावर हे परिवर्तन तातडीने होईल, अशी अपेक्षा होती. त्यासाठी रेल्वे बोर्डाचे अंतिम प्रमाणपत्र हवे होते. आता हे प्रमाणपत्र आले असून २३ मेच्या मध्यरात्री मध्य रेल्वेवर ठाणे ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या दरम्यान डीसी-एसी परिवर्तन पूर्ण होणार आहे, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी स्पष्ट केले. या परिवर्तनानंतर मध्य रेल्वेवरील उपनगरीय गाडय़ांचा वेग ताशी १०० किमीपर्यंत वाढवला जाऊ शकतो. तसेच मध्य रेल्वेवर नवीन बंबार्डिअर गाडय़ा धावणेही शक्य होणार आहे.