लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : भारतीय रेल्वे सुरू झाल्यापासून प्रवाशांचे सामान वाहून नेण्याचे काम हमाल करत आहेत. मात्र सध्या चाकाच्या बॅगा, लिफ्ट, ट्रॉली बॅग, बैटरी वॅन, स्वयंचलित जिना या सुविधा सुरु आल्याने हमालांचा रोजगार कमी झाला आहे. त्यामुळे हमालांच्या रोजगाराचा प्रश्न मिटवण्यासाठी रेल्वे मंडळाकडून काहीअंशी प्रयत्न करण्यात येत आहेत. रेल्वे मंडळाने दिलेल्या आदेशानुसार मध्य रेल्वेने रेल्वे स्थानकांवरील हमालांच्या शुल्कात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला असून हमालांच्या शुल्कात १० रुपयांनी वाढ झाली आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्रति फेरी ४० किलोपर्यंतचे सामान वाहून नेण्यासाठी स्थानकानुसार शुल्क आकारले जाते. सीएसएमटी, एलटीटी, दादर, ठाणे आणि कल्याण यांसारख्या मोठ्या स्थानकांतील हमाली ७५ रुपयांवरून ८५ रुपये, मध्यम स्वरूपाच्या स्थानकांत ७० रुपयांवरून ८० रुपये आणि लहान स्थानकांत ६५ रुपयांवरून ७० रुपये हमाली आकारली जाणार आहे. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातून ते पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकापर्यंत किंवा याउलट ४० किलोपर्यंतचे सामान वाहून नेण्यासाठी ८५ रुपये आकारले जातील. तसेच हातगाडीवरून १६० किलो वजनाचे सामान वाहून नेण्यासाठी १३५ रुपये आकारले जातील. आजारी किंवा दिव्यांग प्रवाशांची व्हीलचेअरवरून नेण्यासाठी १३५ रुपये आकारले जातील.

हेही वाचा >>>Mumbai Crime : “१० लाख रुपये दे नाहीतर बलात्काराच्या खोट्या प्रकरणात..”, मुंबईत महिलेची एक्स बॉयफ्रेंडला धमकी

प्रवाशांना त्यांच्या सामानासह मदत करण्यासाठी परवानाधारक हमाल सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर तैनात असतात. हे हमाल रेल्वेचे कर्मचारी नसले, तरी ते रेल्वेचे अधिकृत आणि परवानाधारक आहेत. प्रवाशांना फक्त स्थानकांमध्ये प्रमुख ठिकाणी प्रदर्शित केलेले शुल्क भरावे लागेल. हमालाचा लाल शर्ट, दंडाला बिल्ला असलेल्या हमालांकडून सेवा घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.