scorecardresearch

मध्य रेल्वे विस्कळीत, प्रवाशांचे हाल; माटुंगा स्थानकाजवळील दुर्घटनेचा परिणाम

माटुंगा स्थानकाजवळ शुक्रवारी रात्री झालेल्या रेल्वे दुर्घटनेमुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक शनिवारीही कोलमडले.  अनेक मेल, एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या.

मुंबई : माटुंगा स्थानकाजवळ शुक्रवारी रात्री झालेल्या रेल्वे दुर्घटनेमुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक शनिवारीही कोलमडले.  अनेक मेल, एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या़  तसेच कामावर निघालेल्या नोकरदारांचे प्रचंड हाल झाले. दादरहून सुटलेल्या पुदुच्चेरी एक्स्प्रेसला ‘सीएसएमटी- गदग एक्स्प्रेस’ने शुक्रवारी रात्री माटुंगा स्थानकाजवळ धडक दिली़  त्यात पुदुच्चेरी एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरुन घसरल़े  या दुर्घटनेत रुळ, ओव्हरहेड वायरसह रुळांजवळील खांबांचेही नुकसान झाले.

शनिवारी धीम्या लोकलचा मार्ग सुरू होता. भायखळा ते माटुंगादरम्यान लोकल जलद मार्गावरून चालवल्या जात होत्या. त्यामुळे जलद आणि धीम्या अशा दोन्ही सेवांचे वेळापत्रक कोलमडले होते. त्यामुळे सकाळी कार्यालय गाठण्यासाठी बाहेर पडलेल्या नोकरदारांचे प्रचंड हाल झाल़े कल्याण ते भायखळापर्यंत सर्वच स्थानकांत गर्दी होती.  सीएसएमटीच्या दिशेने जाणारी जलद लोकल सेवा शनिवारी सकाळी ८.१० वाजता सुरळीत झाली, तर दुपारी १.१० वाजता कल्याणच्या दिशेने जाणारा जलद मार्ग पूर्ववत झाला.

शंभरहून अधिक बस

मध्य रेल्वेने बेस्ट, टीएमटी, एसटी महामंडळ यांच्याशी चर्चा करून जादा बसगाडय़ा सोडण्याची मागणी केली. त्यानुसार शंभर जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु, ही सेवाही अपुरी पडल्याने अनेकांना स्थानकाबाहेरील रिक्षा, टॅक्सींसाठी जादा पैसे मोजून प्रवास करावा लागला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Central railway disrupted passengers condition consequences accident matunga station ysh

ताज्या बातम्या