मुंबई : दिवाळी व छठपूजेनिमित्त रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने ३६ विशेष रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसहून बिहार, उत्तर प्रदेश, गोवा व केरळकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांसह पुण्यातील खडकी व हडपसर स्थानकांहून सुटणाऱ्या विशेष गाड्यांचाही यात समावेश आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात परगावी जाणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त रेल्वेगाड्यांचा पर्याय उपलब्ध होईल.

मुदतवाढ देण्यात आलेल्या रेल्वेगाड्यांपैकी गाडी क्रमांक ०१०४३ लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपूर साप्ताहिक विशेष गाडी आता २४ नोव्हेंबरला चालवली जाईल. गाडी क्रमांक ०१०४४ समस्तीपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी २६ नोव्हेंबरला रवाना होईल. गाडी क्रमांक ०१०५१ लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस द्विसाप्ताहिक विशेष गाडी २५ व २६ नोव्हेंबर, तर गाडी क्रमांक ०१०५२ बनारस-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी २६ व २७ नोव्हेंबरला चालवली जाईल.

गाडी क्रमांक ०११७९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव व गाडी क्रमांक ०११८० मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस या विशेष गाड्यांना २७ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०११२३ लोकमान्य टिळक टर्मिनस-मऊ व गाडी क्रमांक ०११२४ मऊ-लोकमान्य टिळक टर्मिनस या गाड्यांच्या अनुक्रमे २२ व २७ नोव्हेंबर व २४ व २९ नोव्हेंबरला अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जातील.

गाडी क्रमांक ०११४३ लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर व गाडी क्रमांक ०११४४ दानापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस या दैनिक विशेष गाड्या अनुक्रमे २२ ते २९ नोव्हेंबर व २३ ते ३० नोव्हेंबरदरम्यान धावतील. पुणे विभागातील खडकी ते सांगानेर, सांगानेर ते खडकी, हडपसर ते गाझीपूर सिटी व गाझीपूर सिटी ते हडपसर या विशेष गाड्यांनाही प्रत्येकी एक ते दोन अतिरिक्त फेऱ्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

याशिवाय लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम उत्तर व परतीच्या विशेष गाडीची फेरीही नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. या रेल्वेगाड्यांचे विद्यमान मार्ग, वेळापत्रक, डबे, थांबे व भाडे कायम राहणार आहे. आठ विशेष गाड्यांचे आरक्षण ५ नोव्हेंबरपासून संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर व आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू केले जाईल. विनाआरक्षित डब्यांची तिकिटे यूटीएस प्रणालीद्वारे सामान्य दराने उपलब्ध होतील. रेल्वेच्या ‘रेलवन ॲप’वरूनही तिकीट आरक्षित करता येईल.