Central Railway Local Train Derailment At Dombivli: मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानकाजवळ लोकलचे एक चाक रुळावरून घसरल्याची घटना सोमवारी सकाळी ८.०९ वाजता घडली. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ पावले उचलून सुमारे ६० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने लोकलचे चाक पुन्हा रुळावर आणण्यात यश मिळवले. कोपर – कल्याण दरम्यान ठप्प झालेली लोकल सेवा सकाळी १०.४५ वाजल्यापासून सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळच्या गर्दीच्या वेळेत घडल्यामुळे काही काळ लोकल वाहतुकीवर परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे तांत्रिक पथक, अभियंते आणि संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. विशेष उपकरणे आणि यंत्रसामग्रीच्या सहाय्याने त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत लोकलचे चाक रुळावर आणले.

या संपूर्ण प्रक्रियेत कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून जलदगतीने काम केले. तसेच, प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत रेल्वे सेवा शक्य तितक्या लवकर सुरळीत करण्याचे प्रयत्न करण्यात आले. दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी रेल्वेकडून चौकशी सुरू करण्यात आली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रवाशांचा संताप

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने कार्यालयीन वेळेत पोहोचण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागली. कल्याण डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळासह इतर महत्त्वाच्या रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली. धीम्या मार्गावरील रेल्वे स्थानकात लोकल बराच काळ येत नसल्याने, प्रवाशांना कार्यालयात जाण्यास विलंब झाला.

अनेकांनी सुट्टी घेतली. काहींनी घरून काम करण्याबाबत कार्यालयात विनंती केली. परंतु, सर्वांनाच घरून काम करण्याची आणि सुट्टीची मुभा नसल्याने अनेकांनी रेल्वे रुळावर उतरून पायपीट करून पुढील स्थानक गाठण्याचा प्रयत्न केला. लोकल सेवा २० ते २५ मिनिटे उशिराने धावत असल्याने, प्रवाशांचा प्रवास कालावधी वाढला.

मेगाब्लॉकदरम्यान देखभालीखाली असलेल्या रेल्वे  मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक तात्काळ पूर्णपणे बंद करण्यात यावी. देखभाल कामे सुरक्षित आणि विनाअडथळा पार पाडण्यासाठी स्वतंत्र कॉरिडॉर निर्माण करून त्याची कडक अंमलबजावणी करावी. विशेषतः अत्यंत उष्ण हवामानात रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना व मानवीय कामकाजाच्या अटी लागू कराव्यात. प्रवाशांच्या सुरक्षेशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करता येणार नाही. मेगाब्लॉक हे सुरक्षा वाढवण्यासाठी असतात, नव्या समस्यांना जन्म देण्यासाठी नाही. – सिद्धेश देसाई, उपाध्यक्ष, मुंबई रेल प्रवासी संघ