मुंबई : मध्य रेल्वेच्या १८ रेल्वेगाड्यांचा अतिजलद दर्जा रद्द करून त्यांची ””अतिजलद नसलेल्या म्हणून पुनर्वर्गवारी करण्यात येणार आहे. यामध्ये सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस, सीएसएमटी-बनारस महानगरी, सीएसएमटी-हिंगोली जनशताब्दीसारख्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. रेल्वे मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या रेल्वेगाड्यांचे क्रमांकही बदलण्यात येणार असून, नवी व्यवस्था १ जानेवारी २०२७ पासून लागू होईल. मात्र, वर्गवारीतील बदलानंतर तिकीटदरात किती कपात होईल, याबाबत मध्य रेल्वेने स्पष्टता दिली नाही.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार,

सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेसचे क्रमांक १२१२५ आणि १२१२६ ऐवजी अनुक्रमे ११४३५ आणि ११४३६ असतील. सीएसएमटी-हिंगोली जनशताब्दी एक्स्प्रेसचा क्रमांक १२०७१ ऐवजी ११०६९, तर परतीच्या गाडीचा क्रमांक १२०७२ ऐवजी ११०७० होईल. सीएसएमटी-बनारस महानगरी एक्स्प्रेसचे क्रमांक २२१७७ आणि २२१७८ बदलून अनुक्रमे ११०९३ आणि ११०९४ करण्यात येणार आहेत. या निर्णयात लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनंतपुरम नॉर्थ, एलटीटी-करमळी वातानुकूलित, एलटीटी-अयोध्या कँट तुलसी, सीएसएमटी-चेन्नई, एलटीटी-बनारस आणि पुणे-काझीपेट एक्स्प्रेसचाही समावेश आहे. या नऊ जोड्यांतील एकूण १८ रेल्वेगाड्यांचा अतिजलद हा दर्जा रद्द केला आहे. दोन्ही दिशांच्या सेवांचे क्रमांक बदलणार असल्याने प्रवाशांना आरक्षण करताना नव्या क्रमांकांची नोंद घ्यावी लागणार आहे.

अतिजलद रेल्वेगाडीसाठी प्रवाशांद्वारे अतिजलदचा अधिभार आकारला जातो. परंतु, आता अतिजलद नसलेली वर्गवारी लागू झाल्यानंतर हा अधिभार आकारला जाणार की नाही याबाबत मध्य रेल्वेने कोणतीही घोषणा केली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये १८ रेल्वेगाड्यांच्या तिकीट दराबाबत संभ्रम आहे.

रेल्वे मंडळाने २००६ मधील १०५ व्या निर्णय व रेल्वे मंत्रालयाने वारंवार दिलेल्या सुचनांनुसार दोन्ही दिशांंना किमान ताशी ५५ किमी किंवा त्यापेक्षा अधिक वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना ””अतिजलद””चा दर्जा दिला जातो. या रेल्वेगाडीतून प्रवास करताना प्रत्येक प्रवाशांमागे तिकिट दरात एक्झिक्युटिव्ह वातानुकूलित, विस्टाडोम डबा आणि प्रथम श्रेणी वातानुकूलित डब्यांसाठी ७५ रुपये अतिजलद अधिभार आकारला जातो. तर, वातानुकूलित द्वितीय श्रेणी डबा, वातानुकूलित तृतीय श्रेणी डबा आणि वातानुकूलित चेअर कार डब्यासाठी ४५ रुपये, द्वितीय श्रेणी डब्यासाठी १५ रुपये असा अतिजलद शुल्क आकारण्यात येतो.