मुंबई : मध्य रेल्वेने मुंबई, भुसावळ, पुणे, सोलापूर, नागपूर या विभागात शून्य भंगार मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत प्रत्येक विभाग, कारखाना आणि कारशेडमधील भंगाराचे साहित्य गोळा करण्यात आले. याद्वारे २०२५-२६ या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून मध्य रेल्वेला ४५९.५२ कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला.

रेल्वे परिसरातील, आगारातील, कारखान्यातील लोह, स्टील, ॲल्युमिनियम, पितळ, तांबे व इतर धातूच्या भंगाराची विक्री केली. तसेच रेल्वे रुळाचे भाग, पडीक खांब असे वजनदार साहित्य यांचाही त्यात समावेश आहे. या धातूंच्या वस्तू व इतर भंगाराच्या साहित्याला मोठी मागणी असते. त्यामुळे हे साहित्य विकून कोट्यवधी रुपये महसूल मिळाला.

मध्य रेल्वेला २०२५-२६ या आर्थिक वर्षात (३१ मार्च २०२६ पर्यत) भंगार विक्रीतून ४५९.५२ कोटी रुपये महसूल मिळाला. ही रक्कम आर्थिक वर्ष २०२३-२४ नंतरची सर्वाधिक कामगिरी ठरली आहे. या यशासह, मध्य रेल्वेने केवळ रेल्वे मंडळाने निश्चित केलेले ४५० कोटी रुपयांचे उद्दिष्टच ओलांडले नाही, तर गेल्या दोन वर्षांतील सर्वोत्तम कामगिरीही नोंदवली आहे.

विविध श्रेणींतील भंगार आणि टाकाऊ साहित्याची पद्धतशीर विल्हेवाट लावून ही महत्त्वपूर्ण कामगिरी साध्य करण्यात आली आहे. यामध्ये रेल्वे रूळ भंगार ४७,५०२ मेट्रिक टन, लोह – धातू भंगार ३१,२९८ मेट्रिक टन, लोह व्यतिरिक्त – धातू भंगार ३,६१६ मेट्रिक टन, स्लीपर्स २,६५,६२५ नग, रोलिंग स्टॉक ५० लोकोमोटिव्ह, ७८ डबे आणि १३७ वॅगन्स यांचा समावेश आहे.

मध्य रेल्वेच्या भांडार विभागाने कुर्ला कटिंग यार्ड, ट्रॅक्शन मशीन वर्कशॉप (नाशिक), परळ वर्कशॉप आणि मनमाड वर्कशॉप यासारख्या दुर्गम व विखुरलेल्या ठिकाणांसह, मध्य रेल्वेच्या सर्व पाचही विभागांमध्ये पडून असलेला भंगार माल शोधून काढण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी अत्यंत सखोल व सुसूत्र मोहीम हाती घेतली आहे. या केंद्रित प्रयत्नांमुळे विक्री कामगिरीमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

भुसावळ विभाग हा सर्वाधिक कामगिरी करणारा विभाग ठरला आहे. त्याने १०५.३९ कोटी रुपयांच्या भंगार विक्रीची विक्रमी नोंद केली आहे. त्यानंतर माटुंगा कार्यशाळा ६८.३९ कोटी रुपये, नागपूर विभाग ६४.०२ कोटी रुपये, मुंबई विभाग ५५.४९ कोटी रुपये, पुणे विभाग ५० कोटी रुपये आणि उर्वरित रक्कमेत इतर विभाग व उत्पादन घटकांचा वाटा आहे. मध्य रेल्वेने वापरात नसलेल्या, परंतु कार्यरत असलेल्या संसाधनांचा इष्टतम वापर करण्यावरही लक्ष केंद्रित केले. या संदर्भात, वापरात नसलेले, परंतु कार्यरत असलेले एक रोटाटेक छपाई यंत्र भंगारात टाकण्याऐवजी ८.७५ कोटी रुपयांच्या मूल्याने नाशिक छापखान्याकडे यशस्वीरित्या हस्तांतरित केले.