मुंबई : देशाच्या पश्चिमेला नैसर्गिक बंदरामुळे मोठी जहाजे थेट मुंबई बंदरापर्यंत येतात. तेथून रेल्वे मार्गाने देशाच्या कानाकोपऱ्यात मालवाहतूक केली जाते. कमी कालावधीत जास्त मालवाहतूक केल्याने इंधनात आणि इंधन खर्चात मोठी बचत होते. सागरी मार्ग, बंदरे आणि रस्ते मार्गाशी मध्य रेल्वे जोडली गेली असल्याने, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून वेगात आणि अधिक मालवाहतूक होत आहे. त्यामुळे मालवाहतुकीतून मध्य रेल्वेला ४९२ कोटी रुपयांची कमाई झाली आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने २०२५-२६ या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत ५३ लाख टन मालवाहतूक केली. यात जून २०२५ मधील सुमारे ११ लाख टन मालवाहतुकीचा समावेश आहे. या कालावधीत मालवाहतुकीतून विभागाला एकूण ४९२ कोटी उत्पन्न मिळाले असून त्यापैकी तब्बल १७६ कोटी रुपये जून २०२५ मध्ये मिळाले आहेत. जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणातून (जेएनपीटी) झालेल्या कंटेनर लोडिंगमध्ये २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिल ते जून २०२५ दरम्यान १,७६८ कंटेनर्सची वाहतूक करण्यात आली. मागील वर्षी याच कालावधीत १,४९१ कंटेनर्सची वाहतूक करण्यात आली होती. १९ जून रोजी १,२३९ कंटेनर्सची वाहतूक करण्यात आली असून, चालू आर्थिक वर्षातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.
वॅगनच्या वाहतुकीत सकारात्मक वाढ
एप्रिल – जून २०२५ दरम्यान प्रतिदिन सरासरी १,४४५ वॅगन्सची वाहतूक करण्यात आली. मागील वर्षी याच कालावधीत प्रतिदिन सरासरी १,३८८ वॅगन्सची वाहतूक करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी त्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जून २०२५ मध्ये प्रतिदिन सरासरी १,५५० वॅगन्सची वाहतूक करण्यात आली. जून २०२४ मध्ये १,५०५ वॅगन्सची वाहतूक करण्यात आली होती. त्यात यावर्षी ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. १९ जून रोजी १,९१२ वॅगन्सची वाहतूक करण्यात आली. चालू आर्थिक वर्षातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
रेकच्या वाहतुकीत ३ टक्क्यांची वाढ
जून २०२५ मध्ये १,०४६ रेकची वाहतूक करण्यात आली. जून २०२४ मध्ये १,००९ रेकची वाहतूक केली होती. यात ३ टक्क्यांची वाढ झाली आहे.
बिझनेस डेव्हलपमेंट युनिट्सचा यशस्वी उपक्रम
मुंबई विभागात स्थापन करण्यात आलेल्या बिझनेस डेव्हलपमेंट युनिट्सनी कामगिरी उत्तम आहे. सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनच्या मेसर्स महिंद्रा अँड महिंद्रा लि. यांच्या यंत्रसामग्रीचे भाग २९ जून रोजी कळंबोली येथील सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन सायडिंग येथून उत्तर प्रदेशातील बामनहेरी येथे पाठविण्यात आले. यामधून २५.९६ लाखांचे उत्पन्न मिळाले. मुंबई विभागाने मालवाहतूक वाढवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असून, त्याचा परिणाम म्हणून मालवाहतुकीत लक्षणीय वाढ झाली आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.