लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: मध्य रेल्वेवरील विस्टाडोम डबे (पारदर्शक काचेचा डबा) जोडलेल्या एक्स्प्रेसला प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गेल्या सहा महिन्यांत सहा एक्स्प्रेसच्या विस्टाडोम डब्यातून ६६ हजार पर्यटकांनी प्रवास केला असून याद्वारे मध्य रेल्वेला ८ कोटी ४१ लाख रुपये महसूल मिळाला आहे.




मध्य रेल्वेवरील मुंबई – मडगाव जनशताब्दी आणि तेजस, मुंबई – पुणे मार्गावर प्रगती, डेक्कन क्वीन आणि डेक्कन एक्स्प्रेस, पुणे – सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस यांना विस्टाडोम डबा जोडला आहे. प्रवाशांना मुंबई – गोवा मार्गावरील धबधबे, नद्या किंवा मुंबई – पुणे मार्गावरील पश्चिम घाटाचे काचेचे छत आणि लांब – रुंद खिडक्या असलेल्या विस्टाडोम डब्यातून दर्शन घडते. त्यामुळे नोव्हेंबर २०२२ ते एप्रिल २०२३ या सहा महिन्यांत मध्य रेल्वेच्या विस्टाडोम डब्यांमधून सुमारे ६६ हजार प्रवाशांनी प्रवास केला असून याद्वारे तब्बल ८ कोटी ४१ लाख रुपये महसूल मिळाल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
हेही वाचा… मुंबई: मिठी नदीतील पाण्याची गुणवत्ता सुधारणार; दररोज ८० लाख लिटर क्षमतेचा प्रकल्प कार्यरत
मध्य रेल्वेवरील मुंबई- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला २०१८ रोजी सर्वात प्रथम विस्टाडोम डबा जोडण्यात आला. प्रवाशांच्या मागणीमुळे मुंबई – मडगाव मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसला सप्टेंबर २०२२ रोजी विस्टाडोम डबा जोडण्यात आला. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मुंबई – पुणे मार्गावरील डेक्कन एक्स्प्रेसला जून २०२१ रोजी, मुंबई – पुणे मार्गावरील डेक्कन क्वीनला ऑगस्ट २०२१ रोजी आणि प्रगती एक्स्प्रेसला जुलै २०२२ रोजी विस्टाडोम डबा जोडण्यात आला. पुणे – सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसलाही ऑगस्ट २०२२ रोजी विस्टाडोम डबा जोडण्यात आला.
हेही वाचा… राज्यात अवघ्या ३० टक्के शाळा तंबाखूमुक्त; गोंदिया, अमरावती आघाडीवर
विस्टाडोम डब्याला पारदर्शक काचेच्या खिडक्या आणि छत असल्याने आसपासच्या संपूर्ण परिसराचे दर्शन घडते. तसेच दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे, काचेचे छप्पर (टॉप), पुशबॅक आणि १८० डिग्रीमध्ये वळणारी एलसीडी या सर्व बाबींमुळे प्रवाशांना विस्टाडोम डब्यातून प्रवास करण्याचा वेगळाच आनंद मिळत आहे.
नोव्हेंबर २०२२ ते एप्रिल २०२३ कालावधीतील विस्टाडोममधील प्रवासी संख्या आणि उत्पन्न
एक्सप्रेस – प्रवासी संख्या – उत्पन्न
डेक्कन एक्स्प्रेस – १५,५६४ – १.१८ कोटी
प्रगती एक्स्प्रेस – १५,४२३ – १.३१ कोटी
डेक्कन क्वीन – १४,६७२ – १.३५ कोटी
मुंबई – मडगाव जनशताब्दी – ८२५६ – १.७१ कोटी
पुणे ते सिकंदराबाद शताब्दी – ६३३७ – १.३५ कोटी
तेजस एक्सप्रेस – ६०५५ – १.५० कोटी