मुंबई : मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेवरून दररोज सुमारे ४० ते ४५ लाख प्रवाशांचा प्रवास होतो. या प्रवासादरम्यान काही प्रवाशांना उष्माघाताचा त्रास होतो, चक्कर येते, ह्दयविकाराचा झटका येणे अशा घटना घडतात. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती किंवा अपघातांना सामोरे जाणाऱ्या प्रवाशांना तात्काळ मदत करण्यासाठी मध्य रेल्वेच्या कुर्ला, एलटीटी, मानखुर्द, घाटकोपर, चेंबूर यासह एकूण १० महत्त्वाच्या स्थानकांवर सुरू केले आहेत. तसेच प्रवाशांच्या सुविधेसाठी इतर स्थानकात ही सुविधा प्रदान केली जाणार आहे.
लोकलमधील गर्दीच्या वेळेत अपघात, अचानक तब्येत बिघडणे किंवा इतर आपत्कालीन घटनांमध्ये प्रवाशांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभे करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार, मध्य रेल्वेवरील कर्जत, कल्याण, कुर्ला, उल्हासनगर, चेंबूर, कळवा, दादर, वाशी, घाटकोपर आणि भांडुप येथे २०२३ साली आपत्कालीन वैद्यकीय केंद्र सुरू केले होते.
मात्र कुर्ला, चेंबूर, कळवा, भांडुप येथील आपत्कालीन वैद्यकीय केंद्र नोव्हेंबर २०२३ रोजी बंद केले. उल्हासनगर, कर्जत, गोवंडी, ठाणे येथील आपत्कालीन वैद्यकीय केंद्र डिसेंबर २०२३ रोजी बंद केले. जानेवारी २०२४ रोजी गोवंडी, जून २०२४ रोजी ठाणे, जून २०२४ रोजी टिटवाळा, मानखुर्द, पनवेल आणि डिसेंबर २०२४ रोजी विक्रोळी येथील आपत्कालीन वैद्यकीय केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना वैद्यकीय सेवा मिळणे कठीण झाले आहे. याबाबत प्रवाशांनी हे केंद्र सुरू करण्यासाठी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली होती.
त्यानंतर, मध्य रेल्वेने हळूहळू आपत्कालीन वैद्यकीय केंद्र खुले करण्याची प्रक्रिया सुरू केली. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी नुकत्याच माहिती अधिकारातून मागविलेल्या माहितीतून असे स्पष्ट झाले आहे की, मध्य रेल्वेच्या प्रमुख १० रेल्वे स्थानकातील आपत्कालीन वैद्यकीय केंद्र खुले केले आहेत. यामुळे लोकलमधून दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. अचानक प्रकृती बिघडल्यास किंवा अपघात झाल्यास संबंधित प्रवाशांना आता तात्काळ प्राथमिक उपचार मिळू शकणार आहे.
मध्य रेल्वेच्या टिटवाळा, कुर्ला, कर्जत, कळवा, एलटीटी, मानखुर्द, ठाणे, मुंब्रा, घाटकोपर, चेंबूर येथे आपत्कालीन वैद्यकीय केंद्र खुले केले आहे. हे केंद्र ऑक्टोबर २०३० पर्यंत खुले असतील, असे माहिती अधिकारातून स्पष्ट केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ उपचार, प्रवाशांचा जीव वाचवण्यास मदत, मोठ्या स्थानकांवरील वैद्यकीय सुविधा मजबूत, अपघात किंवा अचानक आजारात जलद प्रतिसाद, विशेषतः गर्दीच्या वेळेत किंवा आपत्कालीन घटनांमध्ये या केंद्रांची मोठी मदत होणार आहे. दरम्यान, प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देत अशा प्रकारच्या सुविधा भविष्यात इतर स्थानकांवरही सुरू करण्याचा विचार करण्यात येणार आहे.
