अपंगांसाठीचा डबा भस्मसात; घातपाताची शक्यता
रात्री उपनगरीय सेवा थांबवण्यात आल्यानंतर टिटवाळा येथे ‘लूप लाइन’वर सायडिंगला उभ्या असलेल्या एका उपनगरीयलोकलला आग लागण्याची घटना शनिवारी पहाटे ४ वाजता घडली. या घटनेत या गाडीचा अपंगांसाठीचा डबा जळून खाक झाला. ही आग तांत्रिक बिघाडामुळे लागली की, समाजकंटकांनी लावली याबाबत रेल्वे तपास करणार आहे. त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचेही समजते.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेगाडय़ांच्या ताफ्यातील काही मोजक्याच गाडय़ा दर दिवशी कारशेडमध्ये देखभाल-दुरुस्तीसाठी जातात. उर्वरित गाडय़ा काही ठरावीक स्थानकांजवळ असलेल्या ‘लूप लाइन’वर सायडिंगला उभ्या राहतात. टिटवाळा स्थानकाजवळही मध्य रेल्वेने एक लूप लाइन तयार केली असून सकाळच्या वेळी टिटवाळ्याहून लवकर गाडी निघावी, यासाठी ही सोय करण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री शेवटची टिटवाळा लोकल टिटवाळ्याला पोहोचल्यावर ती लूप लाइनला उभी करण्यात आली. पहाटे चारच्या सुमारास या गाडीतील अपंगांच्या डब्याला आग लागली आणि ती भडकली. अथक प्रयत्नांनंतर ही आग विझवण्यात यश आले.रात्रीच्या वेळी सायडिंगला उभ्या असलेल्या गाडय़ांमधील दिवे रात्रभर चालू असतात. तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांचाही बंदोबस्त असतो. त्यामुळे ही आग तांत्रिक बिघाडामुळे लागली आहे का, याबाबत तपासणी करावी लागणार आहे. मात्र, रेल्वेत रात्रीच्या वेळी गर्दुल्लेही ठाण मांडत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांच्याकडून हा प्रकार झाल्याची शक्यताही काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
चौकशी होणार
या आगीबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडे विचारणा केली असता काहीच उत्तर मिळाले नाही. मात्र, रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाची चौकशी होणार आहे. त्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे समजते.