मुंबई : अपंग प्रवाशांसाठी असलेल्या राखीव जागांवर बसणारे तसेच रेल्वे परिसरातील अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वे हद्दीत विनापरवानगी प्रवेश करणाऱ्यांवर मध्य रेल्वेने कारवाईचा बडगा उगारला. मुंबई विभागाने जुलै महिन्यात विशेष मोहीम राबवून ६७७ जणांवर कारवाई केली. या कारवाईत एकूण १० लाख १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण येथील कोर्ट बॅचेस, लोकल तिकीट तपासणी पथके, महिलांसाठीची ‘तेजस्विनी’ पथके, अमेनिटी टीम्स, रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ); तसेच वाणिज्य विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबवली. यावेळी राखीव जागांवर अनधिकृतपणे बसणाऱ्या ३२१ जणांवर कारवाई करण्यात आली. तर ६.३७ लाख रुपयांचा दंड वसूल केला. तर, कलम १५५(१) (ब) अंतर्गत राखीव डब्यात विनाअधिकार प्रवास करणाऱ्या ९३ जणांकडून ९३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कलम १४४ अंतर्गत ९९ प्रकरणे नोंदवून १.९८ लाख रुपयांचा दंड करण्यात आला. तसेच, रेल्वे रूळ किंवा रेल्वे मालमत्तेत अनधिकृत प्रवेश करणाऱ्या १६४ जणांवर कलम १४७ अंतर्गत कारवाई करून ८२ हजार रुपयांचा दंडवसुली करण्यात आली.

या स्थानकांवर कारवाई मोहीम

या विशेष मोहिमेत मानखुर्द स्थानकात सर्वाधिक २८९ प्रकरणे नोंदली गेली असून ४.४९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यानंतर वडाळा रोड येथे २३२ प्रकरणे व २.५७ लाखांचा दंड, तर ठाणे स्थानकावर ६१ प्रकरणांत १.२२ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण, घाटकोपर, पनवेल, मस्जिद, चिंचपोकळी, चेंबूर, सानपाडा, शिवडी, वाशी आणि लोणावळा स्थानकांवरही कारवाई करण्यात आली.

१३९ क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन

मध्य रेल्वेने प्रवाशांना वैध तिकिटासह प्रवास करण्याचे, दिव्यांगांसाठी राखीव जागांवर बसू नये, अनधिकृत विक्री टाळावी आणि रेल्वे रूळ ओलांडू नयेत, असे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर रेल्वे कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा प्रकारांची माहिती जवळच्या रेल्वे कर्मचाऱ्याला किंवा १३९ या मदतवाहिनी क्रमांकावर देण्याचेही आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे केले.