मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना लोकलच्या विस्कळीत झालेल्या लोकल वेळापत्रकाला सामोरे जावे लागत आहे.

गुरुवारी सकाळच्या सुमारास सीएसएमटीहून पनवेलला जाणाऱ्या वातानुकूलित लोकलचे दरवाजे विलंबाने लागत असल्याने, प्रत्येक स्थानकात लोकल उशिराने पोहचत होती. तसेच चेंबूर रेल्वे स्थानकादरम्यान आपत्कालीन साखळी ओढल्याने, लोकलचा खोळंबा झाला. परिणामी, संपूर्ण दिवसभर प्रवाशांना लोकलच्या लेटलतीफ कारभाराला सामोरे जावे लागले.

हार्बर मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आरामदायी करण्यासाठी, प्रजासत्ताक दिनी १४ वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्या. परंतु, पहिल्याच दिवशी लोकल सेवेचा गोंधळ उडाला. वातानुकूलित लोकलमुळे हार्बर मार्गावरील वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले.

वातानुकूलित लोकलच्या दरवाज्यात तांत्रिक बिघाड झाल्याने, या लोकलसह इतर सामान्य लोकल विलंबाने धावल्या. गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांना या त्रास सहन करावा लागत होता. गुरुवारी ही समस्या प्रकर्षाने प्रवाशांना जाणवली.

सकाळी ७.४० वाजता सीएसएमटी-पनवेल वातानुकूलित लोकलचे दरवाजे बंद होण्यास विलंब होत असल्याने स्थानकात बराच वेळ लोकल उभी राहत होती. वातानुकूलित लोकल स्थानकात येण्यास, दरवाजे खुले होण्यास, पुन्हा हे दरवाजे बंद करण्यास आणि लोकल मार्गस्थ होण्यास बराच वेळ जात होता. त्यात वेळ खर्ची झाल्याने मागून येणाऱ्या लोकलला विलंब झाला. तसेच, परतीचा प्रवास करताना तो अवेळी होत होता. परिणामी, सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला.

गुरुवारी दुपारी १२.२४ वाजता पनवेल ते सीएसएमटी लोकल सुटली. ही लोकल दुपारी १.१५ च्या सुमारास चेंबुर येथे पोहचली असता, या लोकलची आपत्कालीन साखळी (अलार्म चेन पुलिंग) ओढण्यात आली. त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा २० मिनिटे उशिराने धावत होती.

हार्बर मार्गावर वातानुकूिलत लोकल सेवा सुरू झाल्यापासून, लोकल विलंबाने धावण्याचे प्रमाण अधिक झाले आहे. परिणामी, प्रवाशांचा प्रवास रखडत सुरू असून प्रवाशांना वातानुकूलित लोकल बंद करण्याची मागणी केली आहे. हार्बर मार्गावरील लोकल सीएसएमटी ते पनवेल दरम्यान वेळेत पोहचत नसल्याने, प्रवाशांना या लोकल सेवेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे वातानुकूलित लोकलचा वापर करणाऱ्या प्रवाशांची देखील नाराजी आहे.

हार्बर मार्गावरून पहिली वातानुकूलित लोकल २६ जानेवारी रोजी धावण्यास सुरुवात झाली. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सध्या ८० वातानुकूलित लोकल फेऱ्या धावत आहेत. तर, यात हार्बर मार्गावरील १४ वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढल्याने, मध्य रेल्वेवर एकूण ९४ वातानुकूलित लोकल झाल्या.