मुंबईतील रेल्वे प्लॅटफॉर्मची जीवघेणी उंची कमी करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने देऊनही मध्य रेल्वेवरील ६० प्लॅटफॉर्म अजूनही तसेच आहेत. मे २०१५ अखेपर्यंत मध्य रेल्वे उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार २३ प्लॅटफॉर्मची उंची वाढवणार आहे. मात्र पुढील वर्षभरात तब्बल ६० प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे आव्हान मध्य रेल्वेसमोर आहे. मध्य रेल्वेने उंची कमी असलेल्या ८३ प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे काम हाती घेतले आहे.
प्लॅटफॉर्म आणि गाडी यांच्यातील पोकळीत पडून मृत्युमुखी पडणाऱ्या आणि जखमी होणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेत उच्च न्यायालयाने रेल्वेला ही पोकळी भरून काढण्याचे आदेश दिले होते. मध्य रेल्वेने नियोजनबद्ध आराखडा उच्च न्यायालयात सादर करत त्यांच्या हद्दीतील ८३ कमी उंचीच्या प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी मे २०१६पर्यंतचा कालावधी मागितला होता. त्यापैकी २४ प्लॅटफॉर्मची उंची मे २०१५पर्यंत वाढवली जाईल, असेही नमूद करण्यात आले होते. मात्र मध्य रेल्वेने आतापर्यंत १३ प्लॅटफॉर्मची उंची वाढवली आहे. यात ठाणे, घाटकोपर, मुलुंड आदी स्थानकांचा समावेश आहे, तर दहा प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
या दहा प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे काम सध्या सँडहस्र्ट रोड, ठाणे, कॉटनग्रीन, रे रोड आदी ठिकाणी चालू आहे. गर्दीच्या वेळी प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे काम करणे अशक्य असते. त्यामुळे दुपारी कमी गर्दीच्या वेळेत किंवा रात्री उशिरा हे काम करावे लागते. हे काम करण्यास एकसगल अवधी मिळत नसल्याने विलंब लागत आहे. तरीही येत्या मेअखेपर्यंत मध्य रेल्वेच्या २३ प्लॅटफॉर्मची उंची वाढलेली असेल, असे मध्य रेल्वेचे मुख्य स्थापत्य अभियंता यू. पी. सिंह यांनी सांगितले.
मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म उंची वाढवण्यासाठी निवडलेल्या ८३ प्लॅटफॉर्मची सध्याची उंची ८२० मिमीपेक्षा कमी आहे. ही उंची आता सरसकट ९०० मिमी एवढी वाढवली जाईल. त्यामुळे पुढील काळात या पोकळीत पडून होणाऱ्या अपघातांची संख्या कमी होईल, असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. मात्र एका वर्षांत ६० प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे काम आव्हानात्मक असल्याचेही सिंह यांनी सांगितले. त्यासाठी मध्य रेल्वे तयारी करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.