मुंबई : मध्य रेल्वेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हिंदीचा वापर करावा. संगणकीय कामकाज अधिकाधिक हिंदी भाषेतून करावे आणि इतर माध्यमांमध्येही तिचा वापर वाढवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जनसंपर्काशी संबंधित बाबींवर विशेष लक्ष देण्याचे आणि मध्य रेल्वेच्या संकेतस्थळावरील सर्व माहिती इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये देण्यात यावी, असे आवाहन क्षेत्रीय राजभाषा कार्यान्वयन समितीने केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्य रेल्वेच्या मुख्यालयात नुकताच क्षेत्रीय राजभाषा कार्यान्वयन समितीची १९२ वी बैठक पार पडली. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला मध्य रेल्वेचे सर्व प्रधान विभागप्रमुख, सर्व विभागांचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुख्य कारखाना व्यवस्थापक उपस्थित होते.

बैठकीच्या कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी, महाव्यवस्थापकांनी मुख्यालयाच्या राजभाषा विभागाने प्रकाशित केलेले मध्य रेल्वेचे त्रैमासिक ई-मासिक ‘रेल सुरभी – अंक ४५’चे प्रकाशन केले. याप्रसंगी महाव्यवस्थापक गोस्वामी यांनी मार्गदर्शन करताना, मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपापल्या स्तरावर राजभाषेला (हिंदी) प्रोत्साहन देण्यासाठी वैयक्तिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

राजभाषेच्या क्षेत्रात केलेल्या लहान प्रयत्नांचेही भविष्यात चांगले परिणाम दिसून येतील, असे गोस्वामी यांनी म्हटले. त्यांनी विभागीय तपासणीदरम्यान जनसंपर्काशी संबंधित बाबींवर विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. तसेच मध्य रेल्वेच्या संकेतस्थळावरील माहिती इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रसारित करावी, असे स्पष्ट केले.

मध्य रेल्वेवर राजभाषेला प्रोत्साहन देण्यासाठी संगणकीय कामकाज हिंदीमध्ये अधिकाधिक करण्याचे आणि इतर माध्यामांमध्येही तिचा वापर वाढवण्याचे आवाहन प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी आणि मुख्य राजभाषा अधिकारी प्रवास पी. पांडे यांनी यावेळी केले. सभेच्या पुढील टप्प्यात, महाव्यवस्थापकांच्या परवानगीने, मध्य रेल्वेवर राजभाषेची निरंतर प्रगती सुनिश्चित करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

‘हिंदीमध्ये बोलण्याचा, व्यक्त होण्याचा आग्रह’

राजभाषा धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मध्य रेल्वेत नियमितपणे कार्यशाळा, स्पर्धा आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. कार्यालयीन कामकाज, पत्रव्यवहार तसेच दैनंदिन व्यवहारात हिंदीचा वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे. मध्य रेल्वेच्या या उपक्रमामुळे प्रशासनात इंग्रजी आणि हिंदीचा वापर वाढविण्याचे काम केले जात आहे. मध्य रेल्वेद्वारे ‘हिंदी सप्ताह’ राबवले जातात. तसेच मध्य रेल्वेच्या अनेक कार्यालयात ‘हिंदी मै बात करेंगे, हमे आनंद होगा’ अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत.