९८ टक्के गुन्हे कमी झाल्याचा दावा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: लोकलच्या दरवाजाजवळ उभे राहिलेल्या प्रवाशाला हेरून त्याच्या हातावर फटका मारून मोबाइल किंवा बॅग लंपास करणाऱ्या फटका गँगच्या मुसक्या आवळण्यात रेल्वेला यश येऊ लागले आहे. २०१९ शी तुलना केल्यास २०२१ मध्ये फटका गँगचे गुन्हे ९८ टक्क्यांनी कमी झाले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे गेल्या वर्षांत अवघ्या दहा घटनांची नोंद झाल्याची माहिती मध्य रेल्वे सुरक्षा दलाकडून देण्यात आली.

फटका गँगने २०१९ मध्ये ५१३ गुन्हे केले होते. यापैकी ५० गुन्ह्यांमधील आरोपींना पकडण्यात रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांना यश आले. २०२० मध्ये ६८ गुन्ह्यांतील १४ जणांना अटक करण्यात आली. तर २०२१ मध्ये दहाच घटना घडल्या असून तीन घटनांमधील आरोपींना पकडण्यात आले आहे. रेल्वे पोलिसांच्या नियोजनामुळे २०२१ मध्ये फटका गँगला लगाम घालण्यात यश आले आहे. प्रवाशांमध्ये केलेली जनजागृती आणि योग्य नियोजनामुळे ते शक्य झाले. फटका गँगच्या जागा हेरून तेथे सुरक्षा दलाचे जवान आणि लोहमार्ग पोलीस तैनात करण्यात आले. गुन्हेगार आणि गुन्ह्यांचा अभ्यास करून छापेमारी करण्यात आली. गुन्हेगारांना पकडण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली. या पथकांनी केलेल्या तपासामुळे गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत झाली आहे, असे मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांनी सांगितले. याबाबत प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी लोकल गाडय़ांमध्ये उद्घोषणा करण्यात येत आहे. लोकलच्या दरवाजाजवळ उभे राहण्यात असलेल्या धोक्याविषयी प्रवाशांना माहिती देण्यात येत आहे. तसेच प्रवासादरम्यान सावधगिरी बाळगण्याचे आवहन प्रवाशांना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

रुळांजवळ गस्त

 रुळांजवळील झोपडय़ांमध्ये वास्तव्य असणारे गुन्हेगार व त्यांच्या कुटुंबीयांची माहिती घेतली जात आहे. मध्य रेल्वेवरील वडाळा, कोपरखैरणे, ऐरोली, नेरुळ, रबाळे, सॅन्डहस्र्ट रोड स्थानक, नाहूर, ठाणे कोपरी पूल, मुंब्राजवळील पारसिक बोगदा, कोपर, डोंबिवली, कल्याण, ठाकुर्ली, विठ्ठलवाडी यासह अन्य काही ठिकाणी फटका गँग सक्रिय होती. फटका गँगच्या १७ जागा हेरण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाचे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway hit gang curb ysh
First published on: 29-01-2022 at 00:02 IST