आर्थिक रुळांवर रेल्वेची गाडी घसरली असताना १६३व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या मध्य रेल्वेने मात्र या आघाडीवर बाजी मारली आहे. देशभरात रेल्वेचे प्रवासी उत्पन्न ३.५६ टक्क्यांनी खालावले असताना मध्य रेल्वेच्या उत्पन्नात मात्र ०.५६ टक्के एवढी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे भारतीय रेल्वेच्या प्रवासी संख्येत २.१३ टक्क्यांनी घट झाली असताना मध्य रेल्वेच्या प्रवाशांमध्येही ०.७१ टक्के एवढी वाढ झाली आहे. या उत्तम कामगिरीसाठी सध्या सुरू असलेल्या ‘रेल्वे सप्ताहा’त मध्य रेल्वेला वाणिज्य क्षेत्रातील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
विमान कंपन्यांनी स्वस्त विमान प्रवासाच्या योजना आणल्यानंतर देशांतर्गत प्रवासासाठी लोक हवाई मार्गाला पसंती देऊ लागले आहेत. त्याचा थेट परिणाम रेल्वेच्या प्रवासी संख्येवरही होऊ लागला आहे. तसेच गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे, जम्मू-काश्मीर परिसरात आलेल्या पुरामुळे आणि इतर कारणांमुळे देशांतर्गत पर्यटनही कमी झाले. त्याचा फटकाही रेल्वेच्या प्रवासी संख्येला बसला. त्यामुळे यंदा ही संख्या तब्बल २.१३ टक्क्यांनी कमी झाली. मात्र याच वेळी मध्य रेल्वेची प्रवासी संख्या ०.७१ टक्क्यांनी वाढली आहे.
देशभरात २०१४-१५ या आर्थिक वर्षांत ७०० कोटी प्रवाशांनी प्रवास केला. यापैकी मध्य रेल्वेच्या प्रवाशांची संख्या १७० कोटी एवढी म्हणजे २५ टक्के आहे.
दरम्यान, मध्य रेल्वेच्या एकूण उत्पन्नातही ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षांत मध्य रेल्वेचे उत्पन्न ९७७८ कोटी रुपये एवढे होते. तर २०१४-१५ या वर्षांत हे उत्पन्न १०८८२ कोटी एवढे झाले आहे. यात प्रवासी उत्पन्नाचा वाटा ४७८० कोटी एवढा असून मालवाहतुकीतून मध्य रेल्वेला ५२५५ कोटी रुपये मिळाले आहेत. तर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मध्य रेल्वेने १०० कोटींपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वेने महसूल वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना हे यश आल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक राजीव दत्त शर्मा यांनी सांगितले.

उपनगरीय प्रवासी संख्येत साडेतीन कोटींची वाढ
दरम्यान, मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या प्रवासी संख्येत वार्षिक साडेतीन कोटींची वाढ झाली आहे. यात मध्य रेल्वेमार्गावर २.५ कोटी प्रवासी वाढले असून पश्चिम रेल्वेवर एक कोटी प्रवासी वाढले आहेत. २०१३-१४ या वर्षांत मध्य रेल्वेवरील उपनगरीय प्रवासी संख्या १६६.४ कोटी एवढी होती, तर २०१४-१५ या वर्षांत ही संख्या १६८.८ कोटी एवढी आहे. तर पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची संख्या २०१३-१४ या वर्षांत १४३.१ कोटी असून पुढील वर्षांत १४४.१ कोटी एवढी झाली आहे. मध्य रेल्वेवर प्रवासी उत्पन्नात ११८ कोटींची वाढ झाली आहे.