रेल्वे रुळ ओलांडू नका, दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पादचारी पुलाचा वापर करा, अशा उद्घोषणा रेल्वे प्रवाशांसाठी सातत्यानं दिल्या जातात. तरीही अनेकजण जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडताना दिसतात. अनेकदा जीव धोक्यात टाकणाऱ्या अशा प्रवाशांना रेल्वे पोलिसांकडून दंड केला जातो. अनेकदा कारवाई केली, तरी रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर परिणाम होत नसल्याचंच चित्र आहे. असाच एक धोकादायक प्रकार कल्याण रेल्वे स्थानकावर रविवारी घडला आहे. लोको पायलटने वेळीच ब्रेक मारल्यानं वयोवृद्ध नागरिकाला नवा जन्म मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपनगरीय रेल्वे मार्गावर रूळ न ओलांडण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने वारंवार केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यातच आता निर्बंध झुगारून रेल्वे स्थानकात प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेश द्वाराऐवजी रेल्वे रूळ ओलांडून स्थानकात प्रवेश मिळवणाऱ्यांची भर पडली आहे. अशाच प्रकारातून कल्याण रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. मुंबई-वाराणसी एक्स्प्रेससमोर एक वयोवद्ध व्यक्ती आली. मात्र, लोको पायलटने वेळीच प्रसंगावधान राखल्यानं मोठा अनर्थ टळला. रेल्वे इंजिन खाली अडकलेल्या वयोवृद्ध नागरिकाला सुखरुपपणे बाहेर काढण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओ मध्य रेल्वेनं सोशल मीडियावर शेअर करत रुळ न ओलांडण्याचं आवाहन केलं आहे. प्रसंगावधान दाखल्याबद्दल लोको पायलटसह इतर अधिकाऱ्यांना २००० हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. तरीही सामान्य प्रवासीही लोकल प्रवासासाठी धडपडत आहेत. लोकलचे तिकीट खिडक्यांवर मिळत नाही. त्यामुळे अनेक जण विविध मार्गाने स्थानकात प्रवेश करून लोकल प्रवासाचा प्रयत्न करतात. तसेच प्रवास करून झाल्यावर तिकीट तपासनीसांची नजर चुकवण्यासाठी अनेक जण स्थानकातील प्रवेशद्वारातून बाहेर पडण्याऐवजी थेट रूळ ओलांडतात, अशी माहिती समोर आली आहे.

रूळ ओलांडताना तीन दिवसांत १८ जणांचा मृत्यू

गेल्या तीन दिवसांत म्हणजेच १० ते १२ जुलै या कालावधीत १८ जणांचा रूळ ओलांडताना लोकल व मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या धडके त मृत्यू झाला. यात १० जुलैला सात जणांचा, ११ जुलैला आठ जणांचा आणि १२ जुलैला तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कु र्ला ते चुनाभट्टी, कोपरखैरणे ते तुर्भे, भायखळा स्थानकाजवळ, भायखळा ते सॅन्डहर्स्ट रोड, मुलुंड ते ठाणे, मुलुंड ते नाहूर, कांजुरमार्ग ते विक्र ोळी, ठाकु र्ली ते कल्याण, विठ्ठलवाडी स्थानक, आसनगाव, प्रभादेवी ते लोअर परळ, अंधेरी ते विलेपार्ले, मालाड ते कांदिवली स्थानकांदरम्यान तीन दिवसांत अपघात घडले आहेत.

अपघात कायम

मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगीय मार्गावर रूळ ओलांडताना २०२० मध्ये लोकल आणि एक्स्प्रेस गाडय़ांच्या धडके त ७३० जणांचा मृत्यू झाला असून १२९ जण जखमी झाले. तर २०१९ मध्ये १ हजार ४५५ जणांचा मृत्यू आणि २७६ जखमी होते. २०२० मध्ये मार्च महिन्यापासून टाळेबंदी लागली आणि रेल्वे प्रवासावर निर्बंध आले. परंतु रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघाताचे प्रमाण फारसे कमी झाल्याचे दिसत नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway kalyan station accident video central railway latest update bmh
First published on: 18-07-2021 at 16:16 IST