मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेला तांत्रिक बिघाडाचा फटका बसला. कर्जतहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकलच्या एका युनिटमध्ये कल्याण-दिवा दरम्यान तांत्रिक दोष आढळल्याने ही लोकल ठाणे स्थानकात आणण्यात आली. मात्र, दुरूस्ती करण्यात अपयश आल्याने दुपारी १२.३३ वाजता ठाण्यातच लोकल रद्द करण्यात आली. अचानक लोकल रद्द झाल्याने प्रवाशांना पुढील प्रवासासाठी दुसऱ्या लोकलचा आधार घ्यावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत-सीएसएमटी जलद लोकल सोमवारी सकाळी ११.१९ वाजता कर्जतहून रवाना झाली होती. कल्याण-दिवा दरम्यान धावत असताना लोकलच्या एका युनिटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर लोकल ठाणे स्थानकात आणण्यात आली. मात्र, तेथेही दोष दूर करता न आल्याने दुपारी १२.३३ वाजता लोकलची सेवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकल रद्द केल्यानंतर प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. त्यानंतर गाडी ठाणे स्थानकातून कारशेडकडे रवाना करण्यात आली. या घटनेमुळे प्रवाशांचा वेळ वाया गेला आणि पुढील प्रवासासाठी त्यांना अन्य लोकल पकडावी लागली.
जलद लोकलच्या वाहतुकीवर परिणाम
या तांत्रिक बिघाडाचा परिणाम तसेच कल्याण ते सीएसएमटी दरम्यानची जलद मार्गावरील लोकल सेवेवर झाला. काही लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावल्या. ठाण्यात लोकल रद्द झाल्यानंतर तिच्यातील प्रवाशांनी अन्य लोकलचा आधार घेतल्याने गर्दीतही वाढ झाली.
देखभाल-दुरुस्ती वर प्रश्नचिन्ह
मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेत तांत्रिक बिघाडाच्या घटना सातत्याने घडत असल्याने लोकलच्या देखभाल-दुरुस्ती व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. लोकलच्या तांत्रिक यंत्रणेची नियमित तपासणी अधिक काटेकोरपणे करून बिघाडांची पुनरावृत्ती टाळावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
