मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल व्यवस्थापकांनी नियमानुसार काम सुरू केल्याने आणि जादा काम करण्यास नकार दिल्याने, मध्य रेल्वेची लोकल सेवा कोलमडली आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास आतापर्यंत तीन लोकल रद्द झाल्या आहेत. तर, इतर लोकल प्रचंड विलंबाने धावत आहेत. तसेच संपूर्ण प्रवास कूर्मगतीने लोकल जात असल्याने प्रवाशांद्वारे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कार्यालयातून घरी प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाला मध्य रेल्वेच्या कारभाराचा सामना करावा लागत आहे. इच्छित लोकल २० ते ३० मिनिटे उशिराने येत असल्याने, प्रवाशांचा वेळ स्थानकात उभे राहण्यास जात आहे. तसेच, लोकल उशिराने येत असल्याने, प्रत्येक स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण या महत्त्वाच्या स्थानकात धीमी आणि जलद लोकल येत नसल्याने, प्रवासी हवालदिल झाले आहेत.

दरम्यान, लोकल व्यवस्थापकासोबत मध्य रेल्वे प्रशासनाची चर्चा चालू आहे. या चर्चेद्वारे याच्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. सीएसएमटीमध्ये काही लोकल व्यवस्थापकांना देण्यात आलेल्या सेफ्टी सक्युलर नंबर १५ मुळे नियमानुसार काम सुरू केले आहे. आतापर्यंत सायंकाळच्या सुमारास तीन लोकल रद्द झाल्या आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.

काय आहे नवीन परिपत्रक

मध्य रेल्वे प्रशासनाने लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत लोकल व्यवस्थापक आणि मोटरमन/लोको पायलट यांच्यातील बेल कोड प्रणालीमध्ये सुधारणा केली आहे. जी अँड एसआर (सामान्य व पूरक नियम) २०२० अंतर्गत ‘करेक्शन स्लीप नंबर १५’ जारी करून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

७ मे २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या या सुधारित आदेशानुसार, लोकलने निश्चित थांबा ओलांडण्याची (प्लॅटफॉर्म ओव्हरशूटिंग) टाळण्यासाठी लोकल व्यवस्थापकाने लोकल नियोजित स्थानकात थांबण्यापूर्वी मोटरमनला एक बेल बीट देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे पुढील स्थानकात गाडी थांबविण्याची पूर्वसूचना मोटरमनला मिळणार आहे.

नवीन नियमांनुसार, मोटरमनकडून प्रतिसाद न मिळाल्यास लोकल व्यवस्थापकाला तातडीने ब्रेक लावण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. विशेषतः लोकल स्थानकाजवळ अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने येत असल्यास गार्ड स्वतः ब्रेक लावून गाडी नियंत्रित करू शकणार आहे. सुधारित बेल कोड प्रणालीमध्ये ‘० बेल कोड’चा वापर विविध परिस्थितींमध्ये स्पष्ट करण्यात आला आहे.

यात आपत्कालीन परिस्थितीत लोकल थांबविणे, नियोजित स्थानकापूर्वी सूचना देणे आणि टीएसआर १२२ अंतर्गत काम सुरू असताना गाडी थांबविणे यांचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाच्या मते, या बदलांमुळे मोटरमन आणि गार्ड यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी होणार असून, प्लॅटफॉर्म ओव्हरशूटिंगसारख्या घटना टाळण्यास मदत होईल. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.