मुंबई : मध्य रेल्वेवरील परळ स्थानकाजवळ मंगळवारी दुपारी वाढत्या उन्हामुळे रेल्वे रूळ प्रसरण पावले. ‘थर्मल एक्स्पान्शन’ने (औष्णिक प्रसरण) रेल्वे रुळांची रुंदी किंचित वाढते. त्यामुळे या मार्गावरून रेल्वेगाड्या चालवणे धोकादायक बनले. परिणामी, दोन वेळा अघोषित ब्लॉक घेऊन रेल्वे मार्गाची दुरुस्ती करण्यात आली. या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा नियोजित वेळेच्या ३० ते ४० मिनिटे विलंबाने सुरू होती.

परळ रेल्वे स्थानकाजवळ डाऊन धीम्या मार्गावरील रुळ वाढत्या उन्हामुळे प्रसरण पावले. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या संबंधित विभागातील अधिकारी – कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यासाठी दुपारी १२.३० ते १२.४५ दरम्यान ब्लॉक घेतला. या ब्लॉक काळात आवश्यक कामे पूर्ण न झाल्याने, दुपारी १.०५ ते दुपारी १.२५ दरम्यान दुसरा ब्लॉक घेण्यात आला. दरम्यान, बिघाडामुळे अप आणि डाऊन मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. काही लोकल भायखळा स्थानकाजवळ थांबविण्यात आल्या, तर त्यानंतरच्या लोकलचे वेळापत्रकही कोलमडले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने आणि कल्याण दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागला. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली असली, तरी विलंबाने धावणाऱ्या लोकलचे वेळापत्रक सुरळीत होण्यासाठी बराच कालावधी लागला.

रूळाच्या प्रसरण झालेल्या भागाची दुरूस्ती

मध्य रेल्वेच्या रेल्वे रुळावरून दररोज हजारोच्या संख्येने लोकल फेऱ्या धावतात. रेल्वे रुळाची दुरुस्ती करण्यासाठी मेगाब्लॉक घेतला जातो. मात्र सकाळी गारवा आणि दुपारी कडक ऊन रेल्वे रुळांसाठी धोकादायक असते. त्यामुळे रेल्वे रुळांचा काही भाग दबला जातो. काही वेळा रेल्वे रुळाला तडा जातो. परिणामी, या रेल्वे रुळांची दुरुस्ती करण्यासाठी अघोषित ब्लॉक घेतला जातो. वाढलेल्या तापमानामुळे रेल्वेच्या तांत्रिक यंत्रणेवर परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वाढत्या उन्हामुळे रेल्वेचे रुळ प्रसरण पावतात. रेल्वे रूळावरून सतत लोकल जात असल्याने रूळांचा आकार पसरट होतो. त्यामुळे लोकल रूळावरून खाली उतरण्याची शक्यता असते. या कारणास्तव रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी रेल्वे रूळांची तपासणी केली. यावेळी रूळाच्या प्रसरण झालेल्या भागाची दुरूस्ती करण्यात आली, अशी माहिती मध्य रेल्वेच्याअधिकाऱ्याने दिली.