मुंबई : मध्य रेल्वेच्या उपनगरी रेल्वेसेवेचा गुरुवारी सकाळी फज्जा उडाला. ठाणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वेगाडीत बिघाड झाला. त्याच वेळी कल्याण-सीएसएमटी रेल्वेगाडीत दिव्याजवळ तांत्रिक दोष निर्माण झाला. या दोन्ही घटनांमुळे एका मागोमाग एक गाड्या खोळंबल्या. त्यामुळे उपनगरी रेल्वेगाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. याचा थेट फटका सकाळी कामावर निघालेल्या नोकरदार, विद्यार्थ्यांना बसला.

सकाळी ७ वाजून ५० मिनिटांची कल्याण-सीएसएमटी वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाडी सकाळी आठच्या सुमारास दिवा स्थानकाजवळ १५ मिनिटे थांबून होती. ८.१५ वाजता रेल्वेगाडीतील बिघाड दूर केल्यानंतर ती पुढे रवाना करण्यात आली. या घटनेमुळे काही काळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.

सकाळी ८.२० वाजता ठाणे-सीएसएमटी रेल्वेगाडी ठाणे स्थानकावर खोळंबून राहिली. फलाट क्रमांक चारवर आल्यानंतर रेल्वेगाडीत तांत्रिक बिघाड आढळून आल्याने ही गाडी तातडीने रद्द करण्यात आली. त्यानंतर ती कुर्ला कारशेडमध्ये रवाना करण्यात आला. ही उपनगरी रेल्वेगाडी सकाळी ८.४२ ते ९.०३ या कालावधीत फलाटावर थांबून राहिल्याने तिच्या मागोमाग आलेल्या रेल्वेगाड्यांची रांग लागली.

त्यामुळे डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा व ठाणे स्थानकांदरम्यानच्या मुंबईच्या दिशेकडील धीमी गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. यामुळे काही रेल्वेगाड्या २० ते ३० मिनिटे उशिराने धावत असल्याने स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली.

‘कॅस्केडिंग इफेक्ट’ काय?

सकाळी गर्दीच्या वेळी उपनगरी रेल्वेगाड्यांची वारंवारिता अधिक प्रमाणात असते. अशा वेळी एखाद्या उपनगरी रेल्वेगाडीला १५ मिनिटे उशीर झाला तरी तिच्या मागोमाग तीन ते चार रेल्वेगाड्यांच्या रांगा लागतात. जर कल्याणमध्ये अशा प्रकारे सेवा विस्कळीत झाल्यास कसाऱ्याहून येणाऱ्या उपनगरी रेल्वेगाड्या व लांब पल्ल्यांच्या गाड्यांना मार्ग मिळत नाही. त्यामुळे अप व डाऊन दोन्ही मार्गांवरील उपनगरी रेल्वे सेवा विस्कळीत होते. त्यानंतर ती पूर्ववत होण्यास तब्बल ३ ते ४ तासांचा कालावधी लागतो.

प्रवाशांची पायपीट

या खोळंब्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली व दिवा स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. १५ मिनिटांचा खोळंबा तात्काळ सोडवण्यात रेल्वे कर्मचाऱ्यांना यश आले असले, तरी त्यामुळे झालेला परिणाम दुपारी उशिरापर्यंत जाणवत होता. नियोजित वेळापत्रकापेक्षा गाड्या विलंबाने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना फलाटांवर दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. रेल्वेगाड्यांमधील प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला. काही प्रवाशांनी रेल्वे रुळांवर उतरून पायपीट करावी लागली.

प्रवाशाची प्रकृती बिघडली

सीएसएमटी ते कल्याण वातानुकूलित धीम्या उपनगरी रेल्वेगाडीतून प्रवास करणारे प्रवासी संजय घाडी (वय ६०) यांची गुरुवारी सकाळी ९.१५ वाजता अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीस व स्थानक कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत केल्याने अनर्थ टळला.