मुंबई : दररोज विविध कारणांनी मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून जाते. गुरुवारी मध्य रेल्वेवर वाहतूक खोळंबण्यास पोकलेनचे निमित्त झाले. विक्रोळी स्थानकात पोकलेनमुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आणि लोकल सेवा ३० ते ४५ मिनिटे उशिराने धावल्या. माटुंगा ते विक्रोळी दरम्यान तीन लोकल सुमारे ४५ मिनिटे थांबल्या होत्या. त्यामुळे शेकडो सरकारी, निमसरकारी, खासगी नोकरदार वर्ग, विद्यार्थी आणि व्यापारी वर्गाला इप्सित स्थळी पोहोचण्यास उशीर झाला.

विक्रोळी स्थानकात गुरुवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पोकलेनद्वारे पायाभूत कामे केली जात होती. त्यावेळी मध्य रेल्वेच्या यंत्रणेला धक्का लागल्याने लोकल सेवा ठप्प झाली. डाऊन दिशेकडील ठाणे, कल्याण, टिटवाळा, आसनगाव, कसारा, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, खोपोलीला जाणाऱ्या लोकल एकाचवेळी थांबल्या.

डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्या. त्यामुळे डाऊन लोकल सेवेचा मार्ग मोकळा झाला. परंतु, माटुंगा ते विक्रोळी दरम्यान तीन लोकल डाऊन जलद मार्गावर वळवणे शक्य न झाल्याने त्यातील प्रवाशांना तब्बल ४५ मिनिटे ताटकळत बसावे लागले. डाऊन दिशेच्या लोकल सेवा उशिराने धावल्याने, अप दिशेकडे जाणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला.

सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना विक्रोळीतील घटनेचा फटका बसला. प्रवाशांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब झाला. तसेच ऐन परीक्षेच्या काळात शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचीही तारांबळ उडाली. धीम्या मार्गावरील लोकल स्थानकात, लोकल येत नसल्याने प्रवाशांची गर्दी जमली.

प्रवाशांना धक्काबुक्की सहन करून लोकल प्रवास करावा लागला. या घटनेची माहिती संबंधित विभागाला कळल्यानंतर, घटनास्थळी मध्य रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी पोहचले. आपत्कालीन ब्लाॅक घेऊन, दुरूस्तीची कामे हाती घेतले. पहाटे ५ ते पहाटे ५.४५ पर्यंत डाऊन मार्ग दुरूस्त केला. परंतु, या घटनेमुळे लोकल सेवा ३० ते ४५ मिनिटे उशिराने धावल्या. या घटनेमुळे दुपारपर्यंत लोकलचे वेळापत्रक बिघडलेले होते. मध्य रेल्वेच्या गलथान कारभारामुळे ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा संपूर्ण ढासळलेला आहे. दररोज सरासरी ३० ते ४० लोकल फेऱ्या रद्द होतात. त्यातच गुरुवारी सकाळी विक्रोळी स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वेळापत्रकाचे तीनतेरा वाजले. मध्य रेल्वेवर लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या, विशेष रेल्वेगाड्यांमुळे उपनगरीय रेल्वेसेवा कायम विस्कळीत होते.

तसेच मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकादरम्यान विकासात्मक पायाभूत कामे सुरू आहेत. ही कामे करण्यासाठी ब्लाॅक घेतले जातात. ब्लाॅकमुळे लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होते. दिवा, चुनाभट्टी येथील फाटक खुले राहिल्याने, अनेक लोकल रद्द केल्या जातात. तसेच तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवेत खंड पडतो.