मुंबई : मध्य रेल्वेवर झालेला तांत्रिक बिघाड आणि ब्लॉकमुळे लोकलचे वेळापत्रक मंगळवारी कोलमडले. अनेक लोकल नियोजित वेळेपैक्षा सुमारे एक तास विलंबाने धावत होत्या. मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाल्याचे त्याचा फटका संपूर्ण दिवस प्रवाशांना बसच होता.
विशेष म्हणजे, हा सलग दुसरा दिवस असून लोकल सेवेत सातत्याने अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदारांसह विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी फलाटावर गर्दी वाढली होती. लोकल मार्गस्थ होत नसल्याने, अनेकांनी रेल्वे मार्गावर पायपीट करून पुढील स्थानक गाठले आणि पर्यायी वाहतुकीचा आधार घेतला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून रेल्वे मार्गावर, स्थानकात सुरक्षा व्यवस्थेचा बंदोबस्त होता. दरम्यान, वारंवार होणाऱ्या बिघाडांमुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत असून, रेल्वे प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
डोंबिवली स्थानकात लोकलचे चाक घसरल्याची घटना सोमवारी घडली. परिणामी, रेल्वे प्रवाशांना कामाच्या ठिकाणी जाण्यास प्रचंड विलंब झाला. रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकल सेवेचे तीनतेरा वाजत आहेत. मध्य रेल्वेच्या गलथान कारभाराला प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक रेल्वे मार्गाचे काम वर्षांनुवर्षे सुरू असूनही अद्याप ते पूर्ण झालेले नाही. राज्य आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने तिसऱ्या मार्गिकेचा प्रकल्प रखडला आहे. प्रलंबित प्रकल्प पूर्ण झाल्यास प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. जेणेकरून कोणती दुर्घटना, तांत्रिक बिघाड झाल्यास प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. – राजेश घनघाव, अध्यक्ष, कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना
सलग दोन दिवस लोकल सेवा विलंबाने धावत आहे आणि यामागील मूळ कारण केवळ तांत्रिक नसून व्यवस्थापकीय आहे. रेल्वे प्रशासन आजही लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य देत आहे. दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या मुंबई लोकल प्रणालीकडे दुय्यम दृष्टिकोन ठेवला जात आहे. रेल्वेचे नियंत्रण पूर्णपणे केंद्र सरकारकडे असल्यामुळे स्थानिक गरजा आणि तातडीच्या समस्या योग्य वेळी हाताळल्या जात नाहीत. ही परिस्थिती तात्काळ बदलणे गरजेचे आहे. मुंबई लोकल ही शहराची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे या मार्गासाठी स्वतंत्र, स्थानिक गरजांनुसार निर्णय घेणारी यंत्रणा असणे अत्यावश्यक आहे. कोकण रेल्वेप्रमाणेच मुंबई लोकल मार्गाची स्वतंत्र प्रशासकीय रचना निर्माण करून ते राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली चालवण्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. प्रवाशांच्या वेळेचा, सुरक्षिततेचा आणि दैनंदिन जीवनाचा प्रश्न असल्यामुळे याकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. तात्पुरते उपाय नव्हे, तर धोरणात्मक आणि दीर्घकालीन बदल करण्याची हीच योग्य वेळ आहे.
– सिद्धेश देसाई, उपाध्यक्ष, मुंबई रेल प्रवासी संघ
रेल्वे प्रवाशांना दररोज त्रास सहन करून लोकल प्रवास करावा लागत आहे. मात्र तरीही लोकप्रतिनिधी याविषयी आवाज उठवताना दिसत नाहीत. सलग दोन दिवस प्रवाशांना प्रचंड विलंबयातना सहन कराव्या लागत आहेत. कार्यालयीन स्थळी पोहोचण्यास उशीर होत आहे. त्यामुळे त्यांना निरनिराळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन खासदारांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन रेल्वे प्रशासनाला जाब विचारणे आवश्यक आहे. रेल्वेमंत्र्यांनी दोन दिवस झालेल्या प्रत्येक बिघाडाची दखल घेऊन, संबंधितांवर कडक कारवाई करावी. अन्यथा प्रवासी आंदोलन करतील. – वंदना सोनावणे, अध्यक्षा, महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी महासंघटना
