मेगाब्लॉकमुळे प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहणाऱ्या मध्य रेल्वेने या रविवारी मेगाब्लॉकला सुटी जाहीर केली खरी पण रविवारी सायंकाळी ‘ओव्हरहेड इलेक्ट्रिसिटी ब्रेकडाऊन’ (ओएचई)चे निमित्त मिळाले आणि छत्रपती शिवाजी टमिर्नसकडे जाणारी अप जलद मार्गावरील वाहतूक सुमारे पाऊणतास विस्कळीत झाली. पारसिकच्या बोगद्याजवळ एका उपनगरी गाडीचे ‘ओव्हरहेड इलेक्ट्रीसीटी ब्रेकडाऊन’ झाल्याने ही गाडी अर्धातास एका जागी खोळंबून राहिली. त्यामुळे या गाडीच्या मागे उपनगरी गाडय़ांची रांग लागली होती.
डोंबिवली रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक पाच वर छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी जलद गाडी मुळात दहा ते पंधरा मिनिटाने उशिरा आली. पावणेपाच वाजता डोंबिवलीहून ही गाडी सुटली आणि दिवा पार करून पारसिकच्या बोगद्याच्या अलीकडे पाचच्या सुमारास थांबली. सिग्नल नसल्याने गाडी थांबली असेल असे प्रवाशांना वाटले. पण पंधरा ते वीस मिनिटे झाली तरी गाडी हलायची कोणतीही चिन्हे नव्हती. गाडीतील पंखे बंद झाल्याने घामाच्या धारा लागल्या होत्या. त्याच वेळी शेजारच्या रूळावरून डाऊन जलद मार्गावरून दोन उपनगरी गाडय़ा, एक लांब पल्ल्याची गाडी धडधडत गेली. आपली गाडी का पुढे जात नाही म्हणून प्रवाशांमध्ये चुळबुळ सुरू झाली. अखेर जवळपास वीस ते पंचवीस मिनिटांनी ‘ओएचई’ ब्रेकडाऊन झाल्यामुळे गाडी खोळंबून राहिली असल्याची घोषणा गाडीत करण्यात आली. यामुळे गाडी का थांबली आहे, त्याचे कारण तरी प्रवाशांना कळले. मात्र तोपर्यंत काही प्रवाशांनी रेल्वेमार्गावर उतरून बाजूला असलेला मोठा नाला पार करून मुंब्रा रेल्वेस्थानक गाठण्याचा मार्ग अवलंबिला.
ब्रेकडाऊन झाल्याच्या घोषणेनंतर पाच ते दहा मिनिटांनी, गाडीचा विद्युतपुरवठा सुरू झाला आणि काही वेळाने गाडी जागेवरून हलली.