मुंबई : मध्य रेल्वेवरील कल्याण – कसारा स्थानकांदरम्यानच्या तिसऱ्या मार्गिकेच्या कामाचा भाग म्हणून खर्डी यार्डच्या पुनर्रचनेसाठी आवश्यक असलेल्या ‘नॉन-इंटर लॉकिंग’ कामाकरिता उंबरमाळी – आटगाव स्थानकांदरम्यान विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामासाठी २५ एप्रिल रोजी दुपारपासून सुमारे १५ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत आसनगाव आणि कसारा स्थानकांदरम्यान लोकल उपलब्ध नसतील.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी १२ पासून ते मध्यरात्री ३ पर्यंत उंबरमाळी – आटगावदरम्यानच्या अप आणि डाऊन मार्गिकांवर ब्लॉक असेल. त्यामुळे कसाराच्या दिशेने जाणाऱ्या लोकल आसनगाव किंवा टिटवाळा स्थानकांवर थांबवण्यात येतील. तसेच याच स्थानकातून लोकल सीएसएमटीच्या दिशेने मार्गस्थ होतील. शनिवारी दुपारी २.४२ वाजता कसारा येथून सुटणारी सीएसएमटी लोकल रद्द करण्यात आली आहे. तर, काही लोकल अंशत: रद्द करण्यात येणार आहेत.
सीएसएमटी येथून सकाळी ९.३४ ते रात्री ९.३२ या वेळेत सुटणाऱ्या सीएसएमटी – कसारा लोकल आसनगावपर्यंत चालवण्यात येतील. सीएसएमटी येथून दुपारी १.३० वाजता सुटणारी सीएसएमटी – आसनगाव लोकल, सायंकाळी ६.२८ वाजता सुटणारी सीएसएमटी – कसारा लोकल, तसेच शनिवारी रात्री सीएसएमटी येथून १२.०८ वाजता सुटणारी सीएसएमटी – कसारा लोकल टिटवाळा येथेच थांबवण्यात येईल. तर शनिवारी रात्री १०.४७ वाजता सीएसएमटी – कसारा लोकल वासिंद येथेच थांबवण्यात येईल.
शनिवारी सकाळी ११.४७ ते रात्री १०.३६ या वेळेत कसारा येथून सुटणाऱ्या कसारा – सीएसएमटी लोकल आसनगाव येथून मार्गस्थ होतील. शनिवारी सायंकाळी ७.१४ आणि रात्री ९.१२ वाजता कसारा येथून सुटणाऱ्या कसारा – सीएसएमटी लोकल टिटवाळा येथून मार्गस्थ होतील.
शेवटच्या आणि पहिल्या लोकल
- ब्लॉक सुरू होण्यापूर्वी सीएसएमटीवरून कसारा दिशेकडे जाणारी शेवटची लोकल, शनिवारी सकाळी ८.३३ वाजता सीएसएमटी-कसारा लोकल असेल.
- ब्लॉक सुरू होण्यापूर्वी कसारावरून सीएसएमटी दिशेकडे जाणारी शेवटची लोकल शनिवारी सकाळी १०.१८ वाजताची कसारा-सीएसएमटी लोकल असेल.
- ब्लॉक संपल्यानंतर सीएसएमटी वरून कसारा दिशेकडे जाणारी पहिली लोकल, रविवारी पहाटे ४.१९ वाजता सीएसएमटीवरून सुटणारी सीएसएमटी-कसारा लोकल असेल.
- ब्लॉक संपल्यानंतर कसाऱ्यावरून सीएसएमटी दिशेकडे जाणारी पहिली लोकल रविवारी पहाटे ३.५१ वाजता कसारावरून सुटणारी कसारा-सीएसएमटी लोकल असेल. मेल आणि एक्स्प्रेसवरही परिणाम होणार असून त्यांच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
