मुंबई :मध्य रेल्वेने लोकल प्रवाशांसाठी मोबाईल यूटीएस सहाय्यक ही नवीन सेवा सुरू केली आहे.३१ ऑक्टोबर २०२५ ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान मोबाईल यूटीएस सहाय्यकांच्या मार्फत तब्बल ५ लाख ४० हजार प्रवाशांना ३ लाख ८६ हजार तिकिटे देण्यात आली.यातून रेल्वेच्या तिजोरीत ६ कोटी ८९ लाखांचा महसूल जमा झाला.मोबाईल यूटीएस सहाय्यकांमुळे प्रवाशांना तिकिट खिडकीवरील रांगेत उभे रहावे लागत नसल्याने वेळ वाचतो. मध्य रेल्वेने तिकिट प्रणाली अधिक वेगवान करण्यासाठी यूटीएस प्रणाली, रेल वन मोबाइल तिकीट ॲप्स सोबतच मोबाइल यूटीएस सहाय्यकाची सुविधा सुरु केली आहे.सीएसएमटी सारख्या प्रमुख स्थानकांवर तिकीट खिडकीवरील गर्दी कमी करण्यासाठी कार्यरत आहे. रेल्वेचे कर्मचारी स्मार्टफोन आणि छोट्या प्रिंटिंग मशीनसह फिरून प्रवाशांना त्वरित तिकीट काढून देतात. सीएसएमटी स्थानकात ही सुविधा गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी सुरु केली. सुरुवातीला ३ सहाय्यक होते. उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांची अपेक्षित गर्दी आणि मिळालेला सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन, जानेवारी पासून आणखी ५ सहाय्यकांची भर घालण्यात आली.सध्या एम-यूटीएस सहाय्यकांची एकूण संख्या ८ आहे.

३१ ऑक्टोबर ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान एम-यूटीएस सहाय्यकांनी प्रत्येक प्रवाशाकडे जाऊन सोपी आणि जलद तिकीट सेवा पुरवून ५.४० लाख प्रवाशांना ३.८६ लाख तिकिटे जारी केली आहेत आणि मध्य रेल्वेच्या वाणिज्यिक महसुलात ६.८९ कोटी रुपयांची भरीव भर घातली आहे.

एम-यूटीएस सहाय्यकांकडे मोबाईल फोन आणि एक लहान तिकीट छपाई मशीन आहे. एम-यूटीएस सहाय्यक कॉनकोर्समध्ये, होल्डिंग एरियामध्ये किंवा रेल्वेच्या आवारात प्रत्येक व्यक्तीकडे जाऊन तिकीट भाडे घेऊन तिकिटे देतात. प्रवाशांना डिजिटल किंवा रोख पेमेंटचा पर्याय उपलब्ध आहे.

विना तिकिट प्रवासाला आळा–डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे मध्य रेल्वेच्या या उपक्रमाने जलद आणि सोयीस्कर तिकीट सुविधा देण्यासोबतच तिकीटविरहित प्रवासाला आळा घालण्यासही मदत केली आहे. जागेवरच तिकिटे सहज उपलब्ध झाल्यामुळे, तिकिटांच्या लांब रांगा आणि प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे तिकीटविरहित प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.