scorecardresearch

मुंबई : कर्तव्यावर असताना मोटरमनला हृदयविकाराचा झटका; अतिदक्षता विभागात उपचार सुरू

सानपाडा येथे लोकल उभी करून, रनिंग रुमकडे जात असताना त्याच्या छातीत दुखू लागले. यावेळी तेथे उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.

central railway motorman suffers heart attack
सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकातील मोटरमन कक्षात कार्यरत असलेल्या एका मोटरमनला सोमवारी सानपाडा कारशेडमध्ये हृदयविकाराचा झटका आला. सानपाडा येथे लोकल उभी करून, रनिंग रुमकडे जात असताना त्याच्या छातीत दुखू लागले. यावेळी तेथे उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. सध्या नवी मुंबई येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा >>> नाशिक येथील आश्रयगृहातील बलात्कार प्रकरण : खटला जलदगतीने चालविण्याचे आदेश देण्यास न्यायालयाचा नकार

सानपाडा कारशेडमध्ये सोमवारी रात्री लोकल उभी करून परतलेले मोटरमन सोमनारायण (५७) यांच्या छातीत दुखू लागले. त्याकडे कानाडोळा करून सोमनारायण रनिंग रुमकडे जात होते. मात्र, त्रास असह्य झाल्याने त्यांना चालता येत नव्हते. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या गार्डने त्याची चौकशी केली. मात्र, त्यावेळी सोमनारायण काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर गार्डने प्रसंगावधान दाखवत सोमनारायण यांना सानपाडा येथील मुख्य यार्ड मास्टरकडे नेले. त्यानंतर, मुख्य यार्ड मास्टरांनी वाशी येथील एनएमएमसी रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना दिल्या. वाशी येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजले. त्यांच्यावर इलेक्ट्रोकार्डिओग्राम (इसीजी) करून औषधे देण्यात आली. तसेच, पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर एंजियोप्लास्टी करण्यात आली. सध्या सोमनारायण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 22:34 IST
ताज्या बातम्या