मध्य रेल्वेमार्गावर गुरुवारी पहाटे कुर्ला ते सायन या स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरील रुळाची पट्टी निघाल्याने वाहतुकीचा गोंधळ उडाला. या गोंधळामुळे दिवसभरात मध्य रेल्वेच्या ४५ फेऱ्या उशिराने धावल्या, तर पाच फेऱ्या रद्द करण्यात आल्या. मध्य रेल्वेची विस्कळीत झालेली सेवा दुपारनंतर पूर्वपदावर आली.
गुरुवारी पहाटे कुर्ला ते सायन दरम्यान अप जलद मार्गावरील रुळाच्या बाजूला लावलेली पट्टी निघाली. त्यामुळे सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी वाहतुकीचा बोजवारा उडाला.  दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले. या काळात अप जलद मार्गावरील वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली होती. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. अप जलद मार्गावरील वाहतूक या दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात आली होती.