मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात गेल्या ११ महिन्यांत तब्बल १६ लाख १६ हजार विनातिकिट (फुकटे) प्रवाशांची धरपकड करण्यात आली. या विनातिकिट प्रवाशांकडून ७१ कोटी ३१ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणाऱ्या विनातिकिट प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

मध्य रेल्वेचा पसारा मोठा आहे. सीएसएमटी – कसारा, कर्जत, पनवेल, उरण आणि गोरेगावपर्यंत मध्य रेल्वे मार्गावरील लोकल धावते. दिवसाला १ हजार ८१० लोकल फेऱ्यांमधून सुमारे ४३ लाख प्रवासी प्रवास करतात. किफायतशीर आणि वेगवान प्रवासासाठी पसंती असल्याने लोकलला प्रचंड गर्दी असते. याच गर्दीचा फायदा विनातिकिट प्रवासी घेतात.

अनेकदा सुट्टे पैसे नसल्याने, तिकिट खिडक्यांवरील प्रचंड रांग, गडबड असल्याने, तसेच तिकिट तपासनीस आपल्याला पकडणार नाही या विचारातून प्रवासी लोकलचे तिकिट काढत नाहीत. तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिट तपासनीस पकडतात आणि त्यांच्याकडून प्रवासाच्या तिकिटाच्या रक्कमेसह दंड वसूल करतात.

एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी-२०२६ दरम्यान मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी पथकांनी उपनगरीय लोकल, मेल व एक्स्प्रेस गाड्यांमध्ये १६ लाख १६ हजार विनातिकिट प्रवाशांची धरपकड केली. या विनातिकिट प्रवाशांकडून दंडापोटी ७१ लाख ३१ हजार रुपये वसूल करण्यात आले. गेल्या वर्षी याच कालावधीत १५ लाख९० हजार विनातिकिट प्रवाशांच्या तुलनेत यंदा २ टक्क्यांनी, तर वसूल केलेल्या दंडाच्या रकमेत ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

लोकलमधील विनातिकिट प्रवासी

प्रकार —- विना तिकिट प्रवासी —– दंड

वातानुकूलित लोकल —- १.१० लाख —– ३.५१ कोटी

प्रथम श्रेणी ——- १.४६ लाख —— ४.६६ कोटी

द्वितीय श्रेणी —– ११.६८ लाख ——- ५८.६० कोटी

वातानुकूलित लोकलमध्ये दिवसाला ४०० फुकटे

मध्य रेल्वेवर दिवसभरात ९४ वातानुकूलित लोकल चालवल्या जातात. त्यापैकी १४ वातानुकूलित लोकल हार्बर मार्गावर धावतात. वातानुकूलित लोकलमध्ये विनातिकिट प्रवाशांची संख्या वाढत आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १.१० लाख विनातिकिट प्रवाशांकडून ३.५१ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. दररोज सरासरी ४०१ फुकट्या प्रवाशांकडून १.२७ लाख रुपये दंड वसूल करण्यात येतो.