मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने वक्तशीरपणा सुधारण्यासाठी दादर- रत्नागिरी पॅसेंजर रद्द करून, दिवा-रत्नागिरी पॅसेंजर चालवण्यात येत आहे. परंतु, तरीही लोकल सेवेच्या वक्तशीरपणात सुधारणा झाली नाही. मात्र, उत्तर भारताकडे जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमुळे मुंबईकरांना दररोज विलंबाने प्रवास करावा लागतो. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये (फेब्रुवारीपर्यंत) ९२.१३ टक्के आहे. तर, हेच प्रमाण आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये (फेब्रुवारीपर्यंत) ९४.१४ टक्के होते. रेल्वे मार्गाची कमी आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या जास्त धावत असल्याने लोकल सेवेचा वक्तशीरपणाचा आलेख घसरला आहे.

मध्य रेल्वेवर मर्यादित रेल्वे मार्ग असल्याने, सध्याच्या लोकल सेवेचा ताण कमी झेपत नसल्याची कारण वारंवार प्रशासनाद्वारे दिली जातात. सध्याच्या घडीला मध्य रेल्वेवर सुमारे १,८२० लोकल फेऱ्या धावत आहेत. परंतु, या फेऱ्यांमधील अनेक फेऱ्या रद्द होत असल्याने प्रवाशांना इच्छित लोकल पकडता येत नाही. प्रवाशांचा प्रवास अवेळी होतो. रेल्वे मार्गावर ताण असला तरी, मध्य रेल्वे प्रशासनाने उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वेच्या संख्येत वाढ केली. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मध्य रेल्वेने एलटीटी ते सहरसा अमृत भारत एक्स्प्रेस, पनवेल – अलीपुरद्वार अमृत भारत एक्स्प्रेस सुरू केली. तसेच विशेष रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांत वाढ केली.

कल्याण रेल्वे स्थानकातून कसारा आणि कर्जत दिशेने रेल्वेगाड्या धावतात. परंतु, या स्थानकात ७ फलाट असल्याने एकाचवेळी जादा लोकल आणि मेल – एक्स्प्रेस उभ्या राहत नाहीत. तसेच कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत दरम्यान मर्यादित मार्ग असल्याने, कसारा आणि कर्जत दिशेकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या मार्गस्थ झाल्याशिवाय लोकलसाठी मार्ग उपलब्ध केला जात नाही. त्यामुळे कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान एका पाठोपाठ लोकल उभ्या असतात. मुंबईतून उत्तर भारताकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या जादा असल्याने कसारा मार्गावरील लोकल सेवेचे तीनतेरा कायम वाजलेले असतात.

  • मध्य रेल्वेवरील एप्रिल २०२१ ते मार्च २०२ या कालावधीत सरासरी वक्तशीरपणा ९४.२६ टक्के होता.
  • एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत सरासरी वक्तशीरपणा ९४.९६ टक्के होता.
  • एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत सरासरी वक्तशीरपणा ९४.५१ टक्के होता.
  • एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत सरासरी वक्तशीरपणा ९३.१० टक्के होता.
  • एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सरासरी वक्तशीरपणा ९२.१३ टक्के होता.

काही नवीन रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. तसेच सध्या मध्य रेल्वे मार्गावर पायाभूत कामे सुरू आहेत. रेल्वे मार्गाची देखभाल-दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकल सेवा उशिराने धावतात. पायाभूत सुविधा केल्यामुळे वक्तशीरपणा वाढत आहे. येत्या काळात पायाभूत कामे, प्रलंबित प्रकल्पे पूर्ण झाल्यास मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा सुधारण्यास मदत होईल. – प्रतीक गोस्वामी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या मार्गात कोणत्याही ठिकाणी तांत्रिक बिघाड होत असल्याने, लोकल सेवा खोळंबते. याचा थेट फटका नोकरदार वर्ग, विद्यार्थी, छोटे व्यावसायिक यांना बसतो. तसेच अनेक रुग्ण लोकलमधून प्रवास करतात. लोकलच्या विस्कळीत वेळापत्रकामुळे रुग्णांना रुग्णालयात जाण्यास विलंब होतो.