मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विद्याविहार रेल्वे स्थानक येथे मध्य पादचारी पूल उभारणीसाठी तुळया उभारणीचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी १५/१६ मे, १६/१७ मे आणि १७/१८ मे २०२६ रोजी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

मध्य रेल्वेवरील कुर्ला (स्थानक वगळून) ते भांडूप (क्रॉसओव्हर वगळून) विविध मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. १५ आणि १६ मे रोजीच्या रात्री १.१५ ते पहाटे ४.१५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, १६ आणि १७ मे रोजीच्या रात्री १.१५ ते ३.०५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या, जलद मार्गावर; तसेच पाचवा आणि सहावा मार्ग ब्लॉक असेल.

१७ आणि १८ मे रोजीच्या रात्रीही काम सुरू राहणार आहे. १६ आणि १७ मेच्या रात्री लोकल सेवांवर काही प्रमाणात परिणाम होणार असून अनेक धीम्या लोकल सेवा जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकांवर काही लोकल सेवांना थांबा मिळणार नाही. याशिवाय काही लोकल रद्द, अंशत: रद्द केल्या जातील.

ठाणे-कुर्ला, ठाणे-सीएसएमटी तसेच सीएसएमटी-ठाणे या काही उशिराच्या फेऱ्या रद्द राहतील. काही सीएसएमटी-ठाणे लोकल सेवा कुर्ला येथेच थांबवण्यात येतील. तर काही लोकल ठाणे किंवा कुर्ला येथूनच पुढे सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, १५/१६ मे आणि १७/१८ मेच्या ब्लॉकदरम्यान रेल्वे वाहतुकीवर विशेष परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच १६-१७ मे रोजी मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम होणार नसल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.

१६-१७ मे रोजी या लोकल सेवांवर परिणाम होणार

  • सीएसएमटी येथून रात्री ११.३० ते रात्री १२.१२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या कर्जतकडे जाणाऱ्या डाऊन धीम्या लोकल माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्या विद्याविहार, कांजूरमार्ग व नाहूर स्थानकांवर थांबणार नाहीत.
  • कसारा येथून रात्री १० वाजल्यापासून बदलापूरहून रात्री ११.२९ वाजता सुटणाऱ्या आणि कर्जत येथून रात्री २.३० वाजल्यापासून अंबरनाथहून रात्री ३.४३ वाजता सुटणाऱ्या सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप धीम्या लोकल सेवा मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे या लोकल नाहूर, कांजूरमार्ग व विद्याविहार स्थानकांवर थांबणार नाहीत.
  • रात्री ११.४० वाजता सुटणारी ठाणे-कुर्ला लोकल, पहाटे ४.०४ वाजता सुटणारी ठाणे-सीएसएमटी लोकल, रात्री ११.३८ वाजता आणि रात्री १२.२४ वाजता सुटणारी सीएसएमटी-ठाणे लोकल रद्द केल्या आहेत.
  • सीएसएमटीहून रात्री ११ वाजता, रात्री ११.४६ वाजता, रात्री ११.५५ वाजता आणि रात्री ११.१२ वाजता सुटणारी सीएसएमटी-ठाणे वातानुकूलित लोकल कुर्ला स्थानकावरच थांबवली जाईल.
  • रात्री १०.१८ वाजता सुटणारी डोंबिवली-सीएसएमटी लोकल, ठाणे स्थानकावरच थांबवली जाईल.
  • विद्याविहारहून पहाटे ४.४५ वाजता सुटणारी कुर्ला-टिटवाळा लोकल ठाण्याहून पहाटे ५.०९ वाजता सुटेल.
  • ठाण्याहून पहाटे ४.१६ वाजता सुटणारी ठाणे-सीएसएमटी लोकल कुर्ल्याहून पहाटे ४.४२ वाजता सुटेल.