मुंबई : मध्य रेल्वेवरील मोटरमन आणि लोकल व्यवस्थापकांची रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत असल्याचे समोर आली आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनेक कर्मचाऱ्यांना जादा वेळ काम करावे लागते. सध्याच्याघडीला १२४ मोटरमनची पदे रिक्त आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मोटरमनची मंजूर ९२३ पदांपैकी १२४ मोटरमन पदे रिक्त आहेत. दरम्यान वेळेनंतर काम न करण्याची भूमिका मोटरमनने घेतल्यामुळे बुधवारी लोकल रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.
लोकल सेवा सुरळीत ठेवण्यासाठी उपलब्ध कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त फेऱ्या करून घेतल्या जात आहेत. काही ठिकाणी विश्रांतीचा कालावधी कमी होत असल्याने थकवा, तणाव आणि कामाचा दबाव वाढत असल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत लोकल सेवा सांभाळताना मोटरमन आणि लोकल व्यवस्थापकांवर मोठी जबाबदारी येत असून, सुरक्षा नियमांचे पालन करताना त्यांना मोठ्या तणावाखाली काम करावे लागत आहे. रेल्वे कर्मचारी संघटनांच्या मते, गेल्या काही वर्षांत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत नव्या भरतीचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. परिणामी, उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकल्या जात आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याबरोबरच लोकल सेवेच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्याच्याघडीला १२४ मोटरमनची पदे रिक्त आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मोटरमनची मंजूर ९२३ पदांपैकी १२४ मोटरमन पदे रिक्त आहेत. तर, फक्त ७९९ मोटरमन कार्यरत आहेत. तर, लोकल व्यवस्थापकांची मंजूर ९९३ पदांपैकी २३२ लोकल व्यवस्थापकांची पदे रिक्त आहेत. तर, फक्त २३२ लोकल व्यवस्थापकांची पदे रिक्त आहेत. मोटरमन प्रमाणेच वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक असलेल्या लोकल व्यवस्थापकांची पदेही रिक्त आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील मोटरमन, लोकल व्यवस्थापक प्रचंड तणावाखाली असून, ताणतणावामुळे मोटरमन स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी अर्ज करत आहेत.
संघटनेचे म्हणणे काय?
कर्मचारी संघटनांनी रेल्वे प्रशासनाकडे रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. तसेच, मोटरमन आणि लोकल व्यवस्थापकांना पुरेसा विश्रांती कालावधी, नियोजित कर्तव्याचे तास आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून प्रवासी सेवा अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळाची कमतरता दूर करणे अत्यावश्यक असल्याचे मत रेल्वे वर्तुळातून व्यक्त होत आहे.
जादा तास काम केल्याने मोटरमन, लोकल व्यवस्थापक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचून जातो. तसेच कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अनेकांना सुट्ट्या घेताना अडचणी येतात. कुटुंबियाकडे दुर्लक्ष झाल्याने कुटुंबातील वातावरण बिघडत आहे, असे मोटरमनकडून सांगण्यात आले.
मध्य रेल्वेवर दररोज १,८२० लोकल फेऱ्या धावत आहेत. या लोकल सेवा वेळेत आणि सुरक्षितपणे चालवण्यासाठी मोटरमन आणि लोकल व्यवस्थापकांवरील कामाचा तणाव कमी करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांचा थकवा आणि संभाव्य अपघात वेळीच रोखणे आवश्यक आहे. तसेच रिक्त पदे वेगाने भरती करून भरणे आवश्यक आहे, असे मत रेल्वे कर्मचारी संघटनेद्वारे व्यक्त करण्यात आले.
