मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील प्रवासी तिकीट निरीक्षक (टीटीआय) मोहम्मद शम्स चंद यांनी चालू आर्थिक वर्षात तिकीट तपासणीदरम्यान एक कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल केला. तर, आणखी एका तिकीट तपासनीसाने ही कामगिरी करून, ‘कोट्याधीश’ तिकीट तपासनीसाच्या यादीत स्थान मिळवले आहे. मुख्य तिकीट निरीक्षक (सीटीआय) प्रवीण मेंथे यांनी ११,५५९ विनातिकीट प्रवाशांना पकडून १ कोटी ६ हजार २३० रुपये दंड वसूल केला.

मध्य रेल्वेवर विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढत असून, त्यामुळे मध्य रेल्वेच्या तिकीटधारक प्रवाशांची डोकेदुखी वाढत आहे. विनातिकीट प्रवाशांचे ओझे, विना महसूल उचलावे लागत असल्याने, मध्य रेल्वेवर गर्दीचा भार वाढला आहे. बुडणारा महसूल आणि तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास सोयीचा होण्यासाठी, मध्य रेल्वेने तिकीट तपासणींचे पथक तयार केले आहे. या पथकाद्वारे दररोज लाखो रुपयांची दंडवसुली करण्यात येत आहे.

नुकताच मोहम्मद शम्स यांनी ११,४८३ विनातिकीट किंवा अनियमित प्रवासाच्या प्रकरणांवर कारवाई करत १ कोटी ३८ हजार ५०५ रुपये दंड वसूल केला. त्यामुळे मुंबई विभागात चालू आर्थिक वर्षात १ कोटी रुपयांची वसुली करणारे ते पहिले तिकीट तपासनीस ठरले. तर, मुख्य तिकीट निरीक्षक प्रवीण मेंथे यांनी ११,५५९ विनातिकीट प्रवाशांना पकडून १ कोटी ६ हजार२३० रुपये इतकी दंडवसुली करणारे दुसरे तिकीट तपासनीस ठरले आहेत.

गेल्या १० वर्षांपासून सीएसएमटी – इगतपुरीदरम्यान धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमधील प्रवाशांची तिकीट तपासणी करत आहे. एलटीटी, सीएसएमटी येथून उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वेगाड्यातील प्रवाशांचे तिकीट तपासले जाते. यातून दररोज १०० ते २०० विनातिकीट प्रवासी आढळून येतात. यांच्याद्वारे १ ते २ लाख रुपयांची दंडवसुली केली जाते, असे प्रवीण मेंथे यांनी सांगितले.

मेंथे हे भारतीय रेल्वेत १९९३ साली कनिष्ठ तिकीट तपासनीस म्हणून रूजू झाले. त्यांनी सर्वप्रथम रे रोड या स्थानकात काम करण्यास सुरुवात केली. या स्थानकात दोन वर्षे काम केले. त्यानंतर कल्याण येथे कर्तव्यास गेले. एक वर्षे या स्थानकात काम केल्यानंतर त्यांची बढती झाली. त्यानंतर पाच – सहा वर्षे ते शहाड येथे कर्तव्यास होते. त्यांनी मेल-एक्स्प्रेसमधील विनातिकीट प्रवाशांना पकडण्याचे मुख्य काम केले. ते सीएसएमटी – इगतपुरी आणि पुढे लोणावळापर्यंत धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमधील प्रवाशांची तिकीट तपासणी करत आहेत. उत्तर भारतात जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमध्ये जास्त तपासणी केली जाते.

सण-उत्सवाच्या काळात रेल्वेमध्ये जास्त गर्दी असल्याने तेव्हा जादा विनातिकीट प्रवासी आढळून येतात. दररोज सुमारे एक लाखांहून अधिक दंडवसुली करून, एक कोटी रुपयांच्या दंडवसुलीचे लक्ष्य पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी गेल्या दोन दिवसांत ३१६ विनातिकीट प्रवाशांकडून लाखो रुपये दंड वसूल केला. ते ३३ वर्षे भारतीय रेल्वेच्या सेवेत असून त्यांनी कनिष्ठ तिकीट तपासनीसापासून मुख्य तिकीट निरीक्षकापर्यंत पदोन्नती मिळवली आहे. याआधीही एक कोटी रुपयांच्या दंडवसुलीचे लक्ष्य पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.