मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील तिकीट तपासनीसाने दंड वसुलीत एक कोटी रुपयांचा टप्पा पार करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्रवासी तिकीट निरीक्षक (टीटीआय) मोहम्मद शम्स चंद यांनी चालू आर्थिक वर्षात तिकीट तपासणीदरम्यान एक कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल केला. त्यामुळे ते मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील ‘करोडपती’ तिकीट तपासनीस ठरले आहेत.
विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करत मध्य रेल्वेच्या तिकीट तपासनीसांनी चालू आर्थिक वर्षात कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल केला. विनातिकीट प्रवास, चुकीचे तिकीट, अनधिकृत प्रवास अशा प्रकारांवर कारवाई करत तिकीट तपासनीस मोहम्मद शम्स चंद यांनी एकट्यानेच करोडो रुपयांची दंडवसुली केली.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२५ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत मोहम्मद शम्स यांनी ११,४८३ विनातिकीट किंवा अनियमित प्रवाशांवर कारवाई करून १ कोटी ३८ हजार ५०५ रुपये दंड वसूल केला. त्यामुळे मुंबई विभागात चालू आर्थिक वर्षात १ कोटी रुपयांची वसुली करणारे ते पहिले तिकीट तपासणी कर्मचारी ठरले. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे रेल्वेला महसुलातील मोठे नुकसान टाळण्यास मदत झाली असून तिकीट तपासणी विभागाची प्रतिमा उंचावली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे इतर कर्मचाऱ्यांसाठीही प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले.
मध्य रेल्वे प्रशासनाने विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहिमा राबवल्या आहेत. स्थानकांवर, लोकलमध्ये; तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये अचानक तपासणी करून प्रवाशांकडून दंड वसूल केला जात आहे. या कारवाईमुळे रेल्वेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ या कालावधीत मध्य रेल्वेमधील मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर या विभागातील ३८ लाख विनातिकीट प्रवाशांद्वारे २२७ कोटी रुपये दंड स्वरुपात वसूल केला.
मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात विनातिकीट प्रवाशांचे प्रमाण १० टक्क्यांनी वाढले. चालू आर्थिक वर्षात मुंबई विभागात १६.१६ लाख प्रकरणांमधून ७१.३२ कोटी रुपयांची दंडवसुली केली. मध्य रेल्वेने प्रवाशांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत विक्रेत्यांकडून, रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडकीतून, एटीव्हीएम मशीनद्वारे किंवा आयआरसीटीसी संकेतस्थळावरून तिकीट घेता येते. तसेच मोबाईलवरील रेलवन अॅपद्वारेही तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. रेल्वे प्रशासनाने विनातिकीट प्रवासाबाबत शून्य सहनशीलता धोरण कायम असल्याचे स्पष्ट केले असून प्रवाशांनी सुरक्षित, जबाबदार आणि सन्मानाने प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
