मुंबई : मध्य रेल्वेच्या ताफ्यात आणखी एक वातानुकूलित लोकल रेक दाखल झाली असून सध्या या गाडीच्या चाचण्या सुरू आहेत. चाचण्या यशस्वी झाल्यानंतर ही गाडी लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.
ही लोकल हार्बर मार्गावर चालवण्याचे मध्य रेल्वे प्रशासनाचे नियोजन असून त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होईल. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर ही लोकल प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देईल.
मध्य रेल्वे प्रशासनाने हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हार्बर मार्गावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून सकाळी – सायंकाळी प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. त्यामुळे नव्या वातानुकूलित लोकलच्या समावेशामुळे गर्दी कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
तसेच, फेऱ्यांमध्ये वाढ केल्याने प्रवाशांना कमी वेळेत अधिक लोकल उपलब्ध होतील. त्यामुळे प्रवास अधिक सुकर, जलद आणि आरामदायी होण्याची अपेक्षा आहे.
मध्य रेल्वेद्वारे २६ जानेवारी २०२६ रोजी सीएसएमटी ते पनवेल दरम्यान पहिली वातानुकूलित लोकल सुरू केली होती. उन्हाळ्यात या लोकल सेवेला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दररोज वाढणाऱ्या गर्दीमुळे वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढविण्याची मागणी जोर धरत होती. याच पार्श्वभूमीवर चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आलेली नवी वातानुकूलित गाडी मुंबईत दाखल झाली. सध्या त्याच्या तांत्रिक आणि सुरक्षा चाचण्या सुरू असून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
या नव्या वातानुकूलित लोकलच्या समावेशामुळे हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकलच्या १४ फेऱ्यांची वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे हार्बर मार्गावरील एकूण वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या २८ वर पोहोचणार आहे. सीएसएमटी ते पनवेल दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना अधिक आरामदायी आणि थंडगार प्रवास उपलब्ध होईल. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून भविष्यात आणखी सुधारणा करण्याचे संकेतही मध्य रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.
मध्य रेल्वेच्या ताफ्यात सध्या एकूण ८ वातानुकूलित लोकल आहेत. यापैकी ७ रेकद्वारे दररोज सुमारे ९४ वातानुकूलित लोकल फेऱ्या चालविण्यात येतात. एक रेक देखभाल आणि राखीव स्वरूपात ठेवण्यात येतो. आता आणखी एक नवीन वातानुकुलित लोकल ताफ्यात दाखल झाल्याने एकूण गाड्यांची संख्या ९ वर पोहचेल.
