मुंबई : मध्य रेल्वेवरील कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात पादचारी उड्डाणपुलाच्या तुळया उभारणीसाठी विशेष ब्लाॅक घेण्यात येणार आहे. विक्रोळी – मुलुंडदरम्यान शनिवारी रात्रकालीन ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या ब्लाॅकमुळे काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

तर, शेवटची सीएसएमटी – कर्जत लोकल विद्याविहार, कांजूरमार्ग व नाहूर या स्थानकांत थांबा घेणार नाही. त्यामुळे या लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गाने अन्य स्थानक गाठावे लागणार आहे.

मध्य रेल्वेने कांजूरमार्ग रेल्वे स्थानक येथे पादचारी उड्डाणपुलासाठी ६ मीटर रुंदीच्या ४ तुळया रोड क्रेनच्या साहाय्याने उभारण्यासाठी विशेष वाहतूक ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा ब्लाॅक शनिवारी १.०५ ते पहाटे ४.३५ दरम्यान असेल. या ब्लाॅकमुळे रात्री १२.२४ वाजता सुटणारी सीएसएमटी – ठाणे लोकल आणि पहाटे ४.०४ वाजता सुटणारी ठाणे – सीएसएमटी लोकल रद्द करण्यात येणार आहे.

रात्री १२.१२ वाजता सुटणारी सीएसएमटी – कर्जत लोकल माटुंगा रेल्वे स्थानक – मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येईल. त्यामुळे ही लोकल जलद मार्गावरील फलाटाअभावी विद्याविहार, कांजूरमार्ग व नाहूर या रेल्वे स्थानकांत थांबणार नाही, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.