मुंबई : मुंबईत ऑक्टोबर महिन्यातील वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण झाले असून त्याचा रेल्वे वाहतुकीवरही परिणाम होऊ लागला आहे. तापमानवाढीमुळे रेल्वे रुळांच्या औष्णिक प्रसरणाची शक्यता लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मंगळवारी घाटकोपर आणि कोपर-डोंबिवलीदरम्यान डाउन धीम्या मार्गावर आपत्कालीन ब्लॉक घेतला. या ब्लॉकमुळे लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. दुसरीकडे, सायंकाळी सीएसएमटी-वडाळादरम्यान हार्बर मार्गावरील अप आणि डाउन मार्गाच्या ओव्हरहेड वायरमध्ये (ओएचई) तांत्रिक बिघाड झाल्याने लोकलचा खोळंबा झाला. उष्णतेचा तडाखा आणि लोकलचा विलंब यामुळे प्रवाशांना फटका बसला.
घाटकोपर येथे दुपारी १२.४५ ते १.१५ या वेळेत डाउन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला होता. त्यानंतर कोपर ते डोंबिवलीदरम्यान दुपारी १.३० ते १.४५ या वेळेत रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली. रुळांची स्थिती तपासणे आणि आवश्यक देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी हे ब्लॉक घेण्यात आले. लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत असल्याने स्थानकांवरील प्रवाशांची प्रतीक्षा वाढली. लोकलमध्ये दुपारीही गर्दी झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
रुळ प्रसरण पावण्याची शक्यता
तापमान वाढल्याने रेल्वे रुळ प्रसरण पाऊ शकतात. त्यामुळे रुळांवर अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता असते. रेल्वे वाहतुकीची सुरक्षितता राखण्यासाठी रुळांची नियमित तपासणी आणि देखभाल आवश्यक आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी काही काळ वाहतूक थांबवून तपासणी व दुरुस्ती करावी लागते.
हार्बर मार्गावर ओएचई बिघाड
सीएसएमटी – वडाळादरम्यान हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गाच्या ओव्हरहेड वायरमध्ये मंगळवारी सायंकाळी ७.११ पासून तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे लोकल वाहतुकीवर परिणाम झाला. काही लोकल मध्येच रेल्वे मार्गात थांबवण्यात आल्या. मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अप हार्बर मार्गावरील ओएचई सायंकाळी ७.१८ वाजता, तर डाउन हार्बर मार्गावरील ओएचई ७.२७ वाजता पूर्ववत करण्यात आली. त्यानंतर या मार्गावरील लोकल वाहतूक पुन्हा सुरू झाली.एकाच दिवशी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्याने प्रवाशांना विलंब आणि गर्दीचा सामना करावा लागला.
