रेल्वे मार्गावरील वाढत्या अपघाताचे प्रमाण पाहता अपघातग्रस्तांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करता यावे, यासाठी ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळा’कडून ‘कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी’अंतर्गत चार रुग्णवाहिका मध्य रेल्वेला देण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिका भायखळा, कल्याण आणि नागपूर येथील सरकारी रुग्णालयात ठेवण्यात येणार आहेत. सध्या सेवेत असलेल्या १०८ या रुग्णवाहिकांत आता या रुग्णवाहिकांची भर पडल्याने रेल्वे अपघात जखमी होणाऱ्या प्रवाशांना तातडीने मदत मिळण्यास मदत होईल, असा दावा रेल्वेचे अधिकारी करत आहेत. सध्या मध्य रेल्वे मार्गावर रोज सुमारे ८ ते १० जण जखमी तर तब्बल १० ते १२ जणांचा मृत्यू होत असल्याचे रेल्वे पोलिसांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या आकडेवारीत पाहायला मिळते. जखमी प्रवाशांना तातडीने मदत मिळावी यासाठी महामंडळाकडून रुग्णवाहिका मध्य रेल्वेला देण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकेमुळे अपघातात जखमी प्रवाशांना तातडीने मदत मिळण्यास मदत होईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.