मुंबई : मध्य रेल्वेवरील कर्जत – लोणावळा घाट विभागात ६ जुलै रोजी झालेल्या रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. अनेक मेल-एक्स्प्रेस रद्द, शॉर्ट टर्मिनेट, शॉर्ट ओरिजिनेट; तसेच वेळापत्रकात बदल करण्यात आल्याने हजारो प्रवाशांना प्रवास करता आला नाही. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने तातडीने परतावा प्रक्रिया राबवली. प्रवास रद्द करावा लागलेल्या ७९ हजार ७४७ प्रवाशांना मध्य रेल्वेने अवघ्या एका दिवसात ५.९१ कोटी रुपये परतावा दिला.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांनी तिकिटे रद्द केली. परतावा प्रक्रिया जलद आणि सुलभ करण्यासाठी सर्व विभागांतील प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले. तसेच विशेष ‘मदत कक्ष’ सुरू करून प्रवाशांच्या अर्जावर तातडीने कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे हजारो प्रवाशांना अल्पावधीत परतावा मिळू शकला.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सर्वाधिक ३७ हजार ३३० प्रवाशांना २.८६ कोटी रुपये परतावा देण्यात आला. तर पुणे विभागात २० हजार ९८२ प्रवाशांना १.५६ कोटी रुपये परतावा मिळाला. त्याचबरोबर भुसावळ, नागपूर आणि सोलापूर विभागातील प्रवाशांनाही परतावा देण्यात आला. दरम्यान, कर्जत – लोणावळा घाट विभागातील रेल्वेमार्ग पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी गाड्यांची सद्यस्थिती तपासावी; तसेच आवश्यक असल्यास रेल्वेच्या मदतवाहिनी किंवा जवळच्या स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

विभाग – प्रवासी – परतावा

मुंबई विभाग – ३७,३३०

– २.८६ कोटी पुणे विभाग – २०,९८२ प्रवासी – १.५६ कोटी

वसई रोड – विरार भागात रेल्वे मार्गावर पाणी भरल्याने, पश्चिम रेल्वेची लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांची सेवा विस्कळीत झाली. मुंबईकडे येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांची सेवा ठप्प झाल्याने, प्रवाशांना प्रवास करता आला नाही. पश्चिम रेल्वेने ७,१३५ प्रवाशांना ५२ लाख ६५ हजार २१२ रुपये परतावा दिला.