मुंबई : मध्य रेल्वेवरील मुंबई – पुणे रेल्वे मार्गावरील पळसदरी – कर्जत रेल्वे स्थानकांदरम्यान मालगाडी अतिवेगाने धावत होती. ही मालगाडी अनियंत्रित झाल्याने, घाट मार्गातून कर्जत दिशेने वेगाने खाली उतरली. त्यामुळे मध्य रेल्वेने ‘मोठ्या सुरक्षा त्रुटी’ची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मालगाडी थांबवण्यासाठी ओव्हर हेड वायरद्वारे पुरवला जाणारा विद्युत पुरवठा खंडित करून, कर्जतदरम्यान मालगाडी थांबण्या तआली. मालगाडी सुरक्षितरित्या थांबल्याने, संभाव्य मोठा अपघात टळला.
दक्षिण मध्य रेल्वेच्या (एससीआर) सिकंदराबाद विभागातून सुमारे ५० डब्यांची मालगाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती. या मालगाडीतून सिमेंटची वाहतूक केली जात होती. गुरुवारी दुपारी १२.०१ वाजता पाच लोकोमोटिव्ह असलेली ही मालगाडी लोणावळा येथून कर्जतच्या दिशेने मार्गस्थ झाली. देशातील सर्वात उंच घाट विभागांपैकी एक असलेल्या खंडाळा घाटावरून मालगाडी खाली उतरत होती. मंकी हिल येथून जात असताना मालगाडीचे ब्रेक लागत नसल्याचे लोको पायलटच्या निदर्शनास आले.
या मालगाडीत दोन प्रशिक्षणार्थी घाट लोको पायलट आणि एक नियमित लोको पायलट होता. याबाबतची माहिती संबंधित विभागाला देण्यात आली. त्यानंतर, कर्जत रेल्वेच्या मध्यम रेल्वे मार्गावरील सर्व सिग्नल हिरवे करून, मालगाडीसाठी मार्ग सुरक्षित करण्यात आला. दुपारी १.३८ च्या सुमारास पळसदरीवरून कर्जतकडे मालगाडी ७५ किमी प्रतितास वेगाने धावत होती. त्यामुळे मालगाडी थांबवण्यासाठी पळसदरी – कर्जतदरम्यान विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर मालगाडीचा वेग कमी होऊन, कर्जत-भिवपुरीदरम्यान मालगाडी थांबवण्यात यश आले.
मालगाडी चौक स्थानकात नेण्यात आली. तेथे ब्रेक तपासण्यात आले. ब्रेक व्यवस्थित काम करत असल्याचे आढळून आले. लोको पायलटना मालगाडी उतारावरून जाताना नियंत्रण ठेवण्यात अपयश आले, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली. तर, सर्व इंजिनचे ब्रेक निकामी झाले होते. लोको पायलटनी ब्रेक लावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र ब्रेक न लागल्याने, मालगाडीवर नियंत्रण मिळवणे अशक्य झाले, अशी माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिली.
या प्रकरणाचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून तपासणी सुरू आहे. – डाॅ. स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे –
