मुंबई : मध्य रेल्वेने फलाटाच्या विस्ताराची कामे हाती घेण्यासाठी ३० मे रोजी मध्यरात्रीपासून ६३ तासांचा जम्बो ब्लॉक घेण्याची घोषणा केली आहे. या जम्बो ब्लॉक काळात ९०० हून अधिक लोकल गाड्या रद्द होणार आहेत. यामुळे, लाखो प्रवाशांच्या कामाच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ नये यासाठी अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून कार्यालयीन काम करण्याची मुभा दिली आहे.

वैद्यकीय क्षेत्र वगळता अनेक आयटी क्षेत्रातील खाजगी कंपन्यानी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून कार्यालयीन काम करण्याची मुभा दिली आहे. हा मेगाब्लॉक गुरुवारी मध्यरात्रीपासून रविवारपर्यंत असल्यामुळे शुक्रवार आणि शनिवारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यासाठी अनेक कंपन्यांनी लॅपटॉप आणि अन्य आवश्यक उपकरणे घरी घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे. तसेच काही कंपन्यांनी गुरुवारी रात्रीपासून कार्यालयाजवळ कर्मचाऱ्यांची निवासाची व्यवस्था केली आहे.

हेही वाचा…कार्यालय गाठण्यासाठी एनएमएमटी, एसटीच्या बसचा पर्याय; बसमध्ये प्रवाशांची गर्दी

मध्य रेल्वेने ६३ तासांचा जम्बो ब्लॉक जाहीर केल्यामुळे शुक्रवार, ३१ मे रोजी आयटी क्षेत्रातील खासगी कंपनीनी अभियंत्यांना घरून काम करण्याची मुभा दिली आहे. मी डोंबिवली येथे राहत असून माझ कार्यालय बीकेसीत आहे. त्यामुळे मला कुर्ला स्थानकावर उतरावे लागते. त्यामुळे जम्बो ब्लॉक कालावधीत मला घरून काम करण्याची मुभा मिळाली आहे.– सुदर्शन वळंजू ( आय टी अभयंता)

मी एका प्रतिष्ठित कंपनीच्या सेल्स आणि मार्केटिंग विभागात काम करतो. शुक्रवारपासून मेगा ब्लॉक असल्यामुळे मला घरून काम करण्यास परवानगी मिळाली आहे. मी ठाणे येथे राहतो. शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस ही मुभा आम्हाला देण्यात आली आहे. – श्रेयस तांबे ( सेल्स आणि मार्केटिंग)

हेही वाचा…मध्य रेल्वे जम्बो ब्लॉक : रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे रुग्ण सेवा सुरळीत

मी मार्केटिंग क्षेत्रात काम करीत आहे. माझ्या कंपनीने गुरुवारी रात्रीपासून शनिवारपर्यंत कार्यालयात राहण्याची सोय केली असून खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी आणि झोपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेकदा कामाचा भार वाढल्यावर आम्हाला कार्यालयात थांबावे लागते. त्यामुळे आम्हाला कंपनीतर्फे अशा सुविधा मिळत असतात. – नितेश आगाशे (मार्केटिंग)