मुंबई : मध्य रेल्वेने भंगार विक्रीतून आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांतच २०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. ५ ऑगस्ट २०२६ पर्यंत मध्य रेल्वेला भंगार विक्रीतून २०२.५५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षी याच कालावधीच्या तुलनेत यावर्षी भंगार विक्रीत ७६.९४ टक्क्यांची वाढ झाली आहे.
भंगार विक्रीतून २०० कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याची ही मध्य रेल्वेची आतापर्यंतची सर्वात जलद कामगिरी असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले. रेल्वे रूळ, स्लीपर्स, लोहयुक्त आणि इतर धातूचे भंगार तसेच जुने लोकोमोटिव्ह, डबे आणि वॅगन्सची नियोजनबद्ध विल्हेवाट लावून हे उत्पन्न मिळवण्यात आले. ५ ऑगस्टपर्यंत मध्य रेल्वेने १७ हजार ७५५ मेट्रिक टन रेल्वे रूळ भंगार, १ लाख २१ हजार ३८१ स्लीपर्स, ११ हजार ६५८ मेट्रिक टन लोहयुक्त भंगार आणि १,३७० मेट्रिक टन इतर धातूची भंगारात विक्री केली. याशिवाय ११ लोकोमोटिव्ह, ३३ डबे आणि ३३ वॅगन्स यांचीही विक्री करण्यात आली.
मुंबई विभागाची ३६.७८ कोटींची कमाई
भंगार विक्रीत मुंबई विभागाने ३६.७८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवत आघाडी घेतली. त्यापाठोपाठ भुसावळ विभागाने ३३.१९ कोटी, पुणे विभागाने २७.२२ कोटी, नागपूर विभागाने २६.१२ कोटी आणि सोलापूर विभागाने १०.८५ कोटी रुपयांची भंगार विक्री केली. उत्पादन युनिट्स आणि कार्यशाळांनी मिळून ६८.३९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले.
भंगाराचा साठा कमी करण्यासाठी माेहीम
मध्य रेल्वेने विभाग आणि आगारामध्ये साचलेल्या भंगाराचा शोध घेणे, त्याचे वर्गीकरण करणे आणि वेळेत विल्हेवाट लावण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये ‘भंगारमुक्त स्थिती’ साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भंगाराचा साठा कमी करण्याबरोबरच, त्याचे उत्पन्नात रूपांतर करणे, कार्यक्षमता वाढवणे आणि पर्यावरण समतोल ठेवण्यासाठी चालना देणे, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.
